विविध नामवंत शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने देशभरातील विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पुण्यातील विमाननगर आणि खराडी परिसरातील २ बोगस कॉल सेंटर्सवर छापे टाकून १० आरोपींना अटक केली असून, तब्बल १ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
काय आहे प्रकरण?
पवई येथील गोखले नगर परिसरात राहणाऱ्या तक्रारदार ग्रेसी पीटर स्वामी (वय ४७) यांच्या मुलाला ‘आयआयटी हैदराबाद’ येथे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष ‘techorbit1111’ या इंस्टाग्राम अकाउंटवरून दाखवण्यात आले होते. संशयित आरोपी गौतम आणि सुमित यांनी त्यांच्याशी संपर्क साधून प्रवेशासाठी एकूण १६ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम घेतल्यानंतर कोणताच प्रवेश न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून १७ जुलै २०२६ रोजी भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३१९(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
अशी झाली कारवाई
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी व सायबर टीमने तांत्रिक तपासादरम्यान आरोपींनी फसवणुकीच्या रक्कमेतून खरेदी केलेले ५ मोबाईल ट्रेस केले. तांत्रिक आणि मानवी कौशल्याच्या आधारे १४ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात आरोपी राहत असलेल्या ‘निऑन होम’मधील रुमवर छापा टाकला. तेथे १० आरोपी सापडले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विमाननगर आणि खराडी येथील २ कॉल सेंटर्सवर छापे मारले.
कॉल सेंटरमधून हस्तगत मालमत्ता
- कॉल सेंटर १ (निऑन होम, विमाननगर, पुणे): ५ मोबाईल, १८ सिमकार्ड, विविध कॉलेजेसच्या नावांचे व मोबाईल नंबरचे कागदपत्रे, १ बीएमडब्ल्यू (BMW) कार आणि १ मारुती सियाझ (Ciaz) कार जप्त.
- कॉल सेंटर २ (सिटी विस्टा बिल्डिंग, खराडी, पुणे): ४ मोबाईल, २ हार्ड डिस्क, १ एचपी लॅपटॉप, १ जिओ बुक, ७ डेबिट कार्ड आणि ५ सिमकार्ड जप्त.
आरोपींच्या अंगझडतीत आणखी १३ मोबाईल सापडले. “एकूण २२ मोबाईल, २३ सिमकार्ड, १ लॅपटॉप, ७ डेबिट कार्ड, २ कार आणि बँक खात्यांमधील २४ लाख रुपये असा १ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे,” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी सांगितले.
गुन्ह्याची पद्धत
“आरोपी २०१९ पासून हे रॅकेट चालवत होते. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या काळात ते इंस्टाग्रामवर जाहिराती देऊन इच्छुक पालकांशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधत. ज्या संस्थेत प्रवेश हवा असेल, त्या परिसराला भेट देऊन स्वतःची प्रशासनात ओळख असल्याचे नाटक करत. त्यानंतर टोकन रक्कम किंवा प्रवेश फीच्या नावाखाली रोख अथवा बँक खात्यात पैसे उकळत असत,” असे तपासी अधिकारी जयदीप गोसावी यांनी सांगितले.
६ गुन्हे उघडकीस:
न्यायालयाने सर्व आरोपींना २० ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तपासात महाराष्ट्रातील (मुंबई, नागपूर) २, उत्तर प्रदेशातील २, कर्नाटक व गुजरात येथील प्रत्येकी १ असे ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. तपासात PICT पुणे, NSUTI व DTU दिल्ली अशा नामवंत संस्थांची यादी आणि ३० मोबाईल नंबर सापडले असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कामगिरी उपायुक्त दत्ता नलावडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत बंडगर (पोलीस निरीक्षक – गुन्हे), पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी (तपासी अधिकारी), पोलीस उपनिरीक्षक प्रशांत केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, पोह सुरनार, पिसाळ, पोशि घाडगे, राठोड, शिरसाठ, मपोशि येवले यांनी पार पाडली.



No comments yet.