सोशल माध्यमातून सट्टा ॲप्सच्या (Betting Apps) प्रचाराविरोधात रील्स बनवून ‘रोस्ट’ केल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना पवईमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पवई पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
यश रणधीर बाबरे (रा. विक्रोळी, मुंबई), प्रतिक राम शिंदें (रा. भुकलवाडी, इंदापूर, जि. पुणे), अनिकेत राम गोडसे (रा. फलटण, सातारा), समीर सुनील कुपडेकर उर्फ एस.के. (रा. चिखली, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.
फिर्यादी चेतन चंद्रकांत देवळेकर हा व्यवसायाने फ्रिलान्सर असून, इन्स्टाग्रामवर विविध विषयावर कंटेट तयार करून रील्स पोस्ट करतो. सोशल माध्यमात काही प्रसिद्ध रील क्रिएटर्स चिनी सट्टा ॲप्सचा प्रचार करून, हे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत असल्याचा प्रकार चुकीचा असल्याबाबत चेतन याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जनजागृतीसाठी काउंटर रील्स तयार केले होते.
या सट्टा ॲपचे प्रमोशन अनेक रीलस्टार पैकी एक प्रतीक शिंदे हा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून करत होता. फिर्यादीने शिंदेच्या या जाहिरातींना ‘रोस्ट’ केले होते. याचा राग मनात धरून ५ ते ६ महिन्यांपूर्वी अनिकेत नावाच्या व्यक्तीने फिर्यादीला इन्स्टाग्रामवर कॉल करून धमकी दिली होती. मात्र, फिर्यादींने आपले काम सुरूच ठेवले.
असे झाले अपहरण आणि मारहाण
“२६ जुलै रोजी फिर्यादी पत्नी व चुलत भावांसोबत पवई येथे फिरायला आला होता. या भागात फिरत असताना येथील पंचकुटीर परिसरात असताना, त्याच्याच परिसरात राहणारा यश बाबरे त्याला तिथे भेटला. भावाचा मित्र असल्याचे वाटल्याने फिर्यादीचे चुलत भाऊ हे पुढे निघून जाताच बाबरे याने गोड बोलण्यात गुंतवून जवळच उभ्या असलेल्या एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीजवळ चेतनला नेले. गाडीला नंबर प्लेट नसल्याने गाडी नवीन घेतली का? असे चेतनने विचारले असता चल तुला सांगतो असे म्हणून, अचानक त्याची मान पकडून बळजबरीने बाबरे याने गाडीच्या पुढील व मागील सीटच्या मधल्या जागेत फिर्यादीला ढकलले,” असे पवई पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.
चेतनने बचावासाठी आरडा – ओरड करताच गाडीत बसलेल्या एका व्यक्तीने फिर्यादींचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला, आणि गळ्यावर पाय देऊन आपल्याजवळील चाकू दाखवून तो पोटात खुपसण्याची धमकी दिली. याचवेळी गाडीत सोबत असलेल्या समीर कुपडेकर उर्फ एस. के. आणि इतर दोन अनोळखी इसमांनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने चेतनला बेदम मारहाण केली व शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादींला मारहाण करतानाचे चित्रीकरण देखील मोबाईलमध्ये रेकोर्ड केले.
“मारहाण सुरू असताना फिर्यादींच्या लक्षात आले की, गाडीच्या को-ड्रायव्हर सीटवर प्रतीक शिंदे बसला आहे, तर धमकी देणारा अनिकेत हा गाडी चालवत होता. ‘आमच्या बेटिंग ॲपविरुद्ध व्हिडिओ का बनवतोस? तुला ॲपचे प्रमोशन करायचे असेल तर कर, पण आमच्या विरोधात व्हिडिओ का बनवतोस? असे फिर्यादीला आरोपींनी धमकावले. फिर्यादीने मी तुमच्या विरोधात रील्स बनवणार नाही, असे सांगितल्यावर जवळपास तासाभरानंतर आरोपींनी रात्री साडे-अकरा वाजताच्या सुमारास त्याला कळंबोली येथे सोडून दिले,” असे तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
घटनेनंतर प्रचंड घाबरलेल्या चेतनने सुरुवातीला वैद्यकीय उपचार घेतले आणि २ ऑगस्ट २०२६ रोजी पवई पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार दाखल केली.
पोलिसांची धडक कारवाई
पवई पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी यश बाबरे याला विक्रोळी परिसरातून अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने आपल्या इतर साथीदारांची नावे आणि ठावठिकाणा सांगताच पोलीस पथकाने प्रतीक शिंदे, अनिकेत गोडसे आणि समीर कुपडेकर यांना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भुकूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले.
“सर्व अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, ७ दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे,” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माराम सावंत यांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलवडे, सहायक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटुकडे (साकीनाका विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे) आत्माराम सावंत यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशांत बंडगर, पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सपोनि माने व गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीरीत्या गुन्हा उघडकीस आणला.




No comments yet.