चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनने २० ऑगस्टला केलेल्या उपोषणानंतर मुंबई महानगरपालिका पुन्हा खडबडून जागी झाली आहे. चांदिवली येथे विकास आराखड्यात मंजूर ९० फूट रस्ता बनवण्याच्या मागणीला जोर देण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी या पालिकेने निविदा मागवल्या आहेत. तसेच प्रस्तावित रस्त्याच्या जागेवरील बाधित खासगी आणि सरकारी बांधकामे हटविण्यासाठी पालिकेकडून ८१५ नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
चांदिवली खैरानी रोड ते जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड पर्यंतचा रस्ता बनवण्याचे काम महापालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्यावतीने चांदिवलीत लवकरच सुरु होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चांदिवलीमधून पवईच्या दिशेने जाणाऱ्या- येणाऱ्या मार्गापर्यंतची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे आणि चांदिवलीवासियांना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग मिळणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
चांदिवलीतील प्रस्तावित ९० फूट रस्ता ८०० मीटर लांब आणि २७ मीटर रुंद असेल. पहिल्या टप्प्यात नहार येथील जागेवरील आणि दुसऱ्या टप्प्यात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मालकी असलेल्या जागेवरील रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
“चांदिवली पाठीमागील काही वर्षापासून वाहतूक कोंडीत अडकलेली आहे. विकास आराखड्यात साकीनाका आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जोडणारा रस्ता दाखवण्यात आला आहे. २०२१मध्ये सुमारे २०० मीटरचा रस्ता बांधण्यात आला आणि आता अर्धवट असलेला रस्ता ट्रक आणि बाईकसाठी पार्किंग म्हणून वापरला जात आहे. वाहतूक कोंडीच्या समस्यांसह अनेक समस्या घेवून पालिका प्रशासनाकडे आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत, मात्र आम्हाला फक्त आश्वासने मिळत आहेत.” असे चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक सदस्य मनदीप सिंग मक्कर यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, “फेब्रुवारीमध्ये रहिवाशांच्या मूक मोर्चामुळे अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी बेठक घेवून लवकरच काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ऑगस्ट महिना संपत आला तरी काम सुरु झाले नसल्याने आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. रहिवाशांची ताकद अखेर पालिकेला समजून आल्याने त्यांनी ९० फूट रस्त्याच्या कामाची प्रक्रिया सुरु केली आहे.”
तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. चांदिवलीतील प्रस्तावित डीपी रस्ता होणाऱ्या जागेवरील सुमारे ८० ते ९० बांधकामे बाधित होणार आहेत. या रस्त्याच्या बाजूच्या खासगी आणि रस्ता होणाऱ्या जागेवरील बाधित बांधकामे हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून ८१५ नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तसेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (केंद्र सरकार) यांच्याकडून चांदिवलीतील जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जागा हस्तांतरीत झाल्यानंतर आणि या जागेवरील बाधित बांधकामे हटविल्यानंतर प्रस्तावित रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. ही जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया देखील जलद गतीने सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले यांनी दिली.
No comments yet.