९० फिट रोडसाठी चांदिवलीकरांचा २० ऑगस्टला उपोषणाचा इशारा

विकास आराखड्यात मंजूर ९० फूट रस्ता बनवण्यात बृहन्मुंबई  महानगरपालिका अपयशी ठरत असून, त्यांच्या या चालढकल कारभाराविरोधात चांदिवलीकर रविवार, २० ऑगस्टला चांदिवली येथे उपोषणाला बसणार आहेत. चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या (CCWA) नेतृत्वात चांदिवली म्हाडा, डी मार्ट समोर नागरिक हे उपोषण करणार आहेत.

सकाळी १० ते संध्याकाळी या वेळेत चांदिवलीत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत हे उपोषण करण्यात येणार आहे.

पाठीमागील दोन दशकात चांदिवलीच्या विकासासोबतच या परिसरातील नागरी सुविधांच्या बाबतीत हा परिसर अधोगतीच्या मार्गावर आहे. विकास आराखड्यात अनेक सुविधा दाखवण्यात आल्या तर आहेत, मात्र या सुविधा फक्त कागद आणि नकाशात दिसत आहेत. प्रत्यक्षात मात्र येथील प्रत्येक नागरिक अनेक समस्यासोबत लढत आहेत.

नागरी समस्यांना घेवून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील पालिका ढिम्म बसल्याने फेब्रुवारी मध्ये चांदिवलीकरांनी मूक मोर्चाचे आयोजन केले होते.

“रहिवाशांच्या मूक मोर्चातील निषेधाचा काहीसा परिणाम होत १७ फेब्रुवारी रोजी रहिवाशांसह बैठक घेवून सहआयुक्त पी वेलरासू यांनी बहुप्रतिक्षित ९० फूट रस्ता बांधण्यासाठी निविदा काढण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी पालिका अधिकाऱ्यांच्या पोकळ आश्वासनाशिवाय कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे आमच्याकडे उपोषण करून निषेध नोंदवण्याशिवाय पर्याय उरला नाही,” असे आवर्तन पवईशी बोलताना चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक मनदीप सिंग मक्कर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “वेलारासू यांनी विकास योजना आणि रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना एका महिन्यात सर्वेक्षण आणि निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. जवळपास सहा महिने आम्ही याचा सतत पाठपुरावा करत आहोत परंतु पालिका अधिकारी आम्हाला फक्त बहाणे आणि नवीन मुदत देत आहेत. त्यामुळे आता यांचे डोळे पुन्हा उघडण्यासाठी आम्ही हे उपोषण करणार आहोत.”

पवई पाठोपाठ पाठीमागील दोन दशकात चांदिवली हे निवासी हॉट-स्पॉट बनले आहे. दोन दशकांमध्ये या परिसरात शेकडो उंच इमारती उभ्या झाल्या आहेत. पालिकेने चांदिवलीत इतके टॉवर बांधण्याची परवानगी दिली आणि इमारती उभ्या देखील राहिल्या मात्र, पालिका ३० वर्षांपूर्वी त्यांनी आखलेला रस्ता बांधू शकली नाही म्हणजे काय? असा प्रश्नदेखील या निमित्ताने चांदिवलीकरांनी उपस्थित केला आहे.

विकास आराखड्यात मंजूर आणि चांदिवलीकरांची मागणी असणारा ९० फूट रोड हा चांदिवलीला साकीनाका (Sakinaka) आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) दोघांना जोडणारा आहे. सोबतच हा मार्ग चांदिवली फार्म रोडला जोडत पुढे जेविएलआरकडे जात असल्याने या परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यास आणि प्रवाशांना दोन्ही दिशेने जाण्यास सोयीस्कर ठरणारा आहे. ५ वर्षापूर्वी चांदिवली येथे १०० फूट रस्ता बनून तयार आहे, मात्र त्यानंतर हा रस्ता अडकूनच पडला आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर बनवावा अशी मागणी चांदिवलीकर करत आहेत.

“टेंडर तयार आहे आणि आधीच मंजूर आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. भूसंपादन पूर्ण झाल्यावर, आम्ही निविदा काढू,” असे एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना वेलरासू यांनी पुष्टी केली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!