₹ ६.६३ लाखाचे शर्ट चोरीच्या गुन्ह्यात दहा महिन्यांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला अखेर साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. रिझवान अरमान हाश्मी उर्फ रिझवान इंद्रीसी साकीनाका असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन कंपन्यांना डिलिव्हरीसाठी दिलेले ६.६३,००० रुपये किंमतीचे १०,५०६ रेडीमेड शर्ट चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
गोरेगाव परिसरात राहणारे मोहम्मद खान यांचा साकीनाका परिसरात कपड्यांचा कारखाना आहे. त्यांच्या या कारखान्यात आठ कामगार काम करत असून, रिझवान देखील त्यातील एक होता.
पाठीमागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना वडाळा आणि वसईतील कापड व्यावसायिकांकडून ९०० आणि ८५० शर्ट्सची ऑर्डर मिळाली होती. नोव्हेंबर महिन्यातच दोघानाही शर्टची डिलिव्हरी द्यायची होती, परंतु मोहम्मद खान हे गावी असल्याने त्यांनी नंतर डिलिव्हरी करणार असल्याचे दोघांना सांगितले.
परतल्यानंतर रिझवानने कारखान्यातून डिलिव्हरीसाठी घेतलेले १०५० शर्ट डिलिव्हरी केली नसल्याचे त्यांच्या समोर आले. त्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाईल सतत बंद येत होता. तो शर्ट घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी साकीनाका पोलिसात तक्रार दिली.
तक्रारीनंतर पोलिसांनी रिझवानचा शोध सुरू केला होता मात्र जवळपास दहा महिन्यांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अखेर साकीनाका पोलिसांच्या विशेष पथकाला त्याचा मागोवा मिळाला आणि सापळा रचून पोलिसांनी त्याला सदर गुन्ह्यात अटक केली.
No comments yet.