पालिका एस विभागांतर्गत येणाऱ्या पवई परिसरात कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला असून, सोमवार २२ जून रोजी पवईमध्ये ३ बाधितांची नोंद झाली आहे. पवई परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंत मिळालेल्या बाधितांचा आकडा पाहता पवई परिसरात बाधित मिळण्याचा वेग मंदावला असल्याचे समोर येत आहे.
कोरोना विषाणूंनी मुंबईवर आपली पकड घट्ट केली असून, पालिका ‘एस’ विभाग कोविड-१९च्या यादीत पहिल्या दहामध्ये पोहचला आहे. पालिका ‘एस’ विभागात येणाऱ्या भांडूप, कांजुरमार्ग, विक्रोळी आणि पवई परिसरात १६ जून २०२० पर्यंत ३१६६ बाधितांची नोंद झाली आहे. या विभागातील पवई परिसरात सुद्धा मे आणि जून महिन्यात मोठ्या प्रमाणात बाधित मिळून आले आहेत. मात्र जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बदल घडून येत येथील परिसरात बाधित मिळण्याचा वेग मंदावला आहे.
सोमवारी पवई परिसरातील तिरंदाज व्हिलेज भागात २३ वर्षीय तरुण, गणेशनगर (पंचकुटीर) येथे ६५ वर्षीय पुरुष आणि हिरानंदानी येथील ६० वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यातर्फे सांगण्यात आले.
“पाठीमागील काही आठवड्यांचा आकडा पाहता पवई परिसरात कोरोना बाधित मिळण्याचा वेग कमी झाला असल्याचे नक्कीच म्हणता येईल. मात्र नागरिकांनी पुढील काळात सुद्धा कायम अशीच काळजी घेणे आवश्यक आहे,” असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
पवई परिसरात पोलीस आणि कोविड पोलीस यांच्या माध्यमातून चांगलेच नियंत्रण ठेवले जात आहे. नागरिकांनी सुद्धा याला गांभीर्याने घेतले असल्याचे म्हणण्यास हरकत नाही. म्हणूनच पालिका एस विभागातील बरेच परिसर पुन्हा लॉक झालेले असतानाच पवईत परिसर सील करण्याची वेळ आलेली नाही, असे पवई पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.
#मास्क_लावा, सोशल_डीस्टंगसिंग_पाळा आणि कोरोनाचा_धोका_टाळा
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
Finally some good news around !!