जेवणाच्या कारणावरून आईला मारहाण करत असलेल्या वडिलांना मुलाने केलेल्या मारहाणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याची घटना पवई परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवून मुलाला अटक केली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईच्या आयआयटी परिसरात राहणाऱ्या शिवशरण यांचे १२ जूनला आपल्या पत्नीशी जेवणावरून भांडण सुरु होते. ते पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास धावले असता त्यांचा मुलगा त्यांना रोखण्यास पुढे आला. मात्र ते ऐकतच नसल्याने त्याने त्यांना पकडून मारहाण केली.
काही वेळाने भांडण शांत झाले आणि संपूर्ण कुटुंब झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीय शिवशरण यांना उठवण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी शिवशरण यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
प्रथमदर्शी शिवशरण यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वाटल्याने अपमृत्यू नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल येताच सर्वांच्या पायाखालची जमीनच घसरली. मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना मारहाण करणारा त्यांचा मुलगा अशोक याला अटक केली आहे.
No comments yet.