प्रामाणिक तरुणाने परत केला रस्त्यात सापडलेला महागडा फोन

प्रामाणिक लोक या जगात अजूनही शिल्लक आहेत याचे एक उत्तम उदाहरण आज पहाटे पवईत पहायला मिळाले. कर्तव्य आणि प्रामाणिकपणा याची योग्य सांगड घालत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या अंकित गंभीर या तरुणाने रस्त्यात  पडलेला महागडा फोन त्याच्या मालकाला परत केला आहे. आपले कर्तव्य तर पूर्ण करतानाच त्याने आपला प्रामाणिकपणा जपल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर पत्रकार हे सकाळी ६.३०च्या सुमारास मोटारसायकलवरून आपल्या मुलाला आयआयटी पवई येथे शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मुलाला सोडून परतत असताना काहीच अंतरावर त्यांना आपल्या खिशात असणारा फोन कोठेतरी पडला असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच आसपासच्या परिसरात फोनचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र फोन मिळून आला नाही.

शोध घेत असताना त्यांना रस्त्यात भेटलेले मित्र बिपीन देढीया आणि दिपा खोत यांना आपला फोन हरवल्याचे सांगितले. तेव्हा त्या दोघांनीही त्या फोनच्या नंबरवर कॉल केला असता फोन चालू असून, कोणीच उचलत नव्हते. त्यामुळे दोघेही कोणीतरी फोन सापडला तर फोन उचलेल या आशेने त्या नंबरवर सतत फोन करत होते.

“फोनची रिंग होत असल्याने फोन कदाचित अजूनही रस्त्यात कोठेतरी पडला असेल फोनची रिंग ऐकून कोणीतरी फोन उचलेल आणि संपर्क होईल या विश्वासाने मी सतत त्यावर फोन करत होतो. काही वेळाने एका तरुणाने फोन उचलला आणि “साहब फोन मुझे मिला है| मै डिलिव्हरी करने विक्रोळी आया हू| फोन कहा लाके दू बताओ”| असे म्हणताच माझ्या जीवात जीव आला. फोन अखेर मिळाला होता.” असे बिपीन यांनी सांगितले.

याचवेळी खोत यांचा देखील सदर नंबरवर संपर्क झाला आणि फोन घेवून तरुण आयआयटी,पवई येथील एक्सएल प्लाझा येथे येत असल्याचे समजले. याबाबत त्यांनी लगेच फोन मालकाच्या परिवाराशी संपर्क साधून फोन सापडला असून, फोन घेवून तरुण येत असल्याचे सांगितले.

अखेर फोन मालकाच्या स्वाधीन करताना सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या घटनेतून प्रामाणिकपणा आणि माणूसकी जगात आजही शिल्लक आहे याची पुष्टी अंकितच्या रुपात झाली. सोबतच मैत्रीच्या नात्याची घट्ट विण ही प्रत्येक प्रसंगी सोबत असते हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!