संघर्षनगरमधील नवीन महानगरपालिका रुग्णालयाचे काम रखडले आहे आणि या कामात दिरंगाई करणाऱ्या नगर नियोजक आणि कंत्राटदारांना बदलून या कामासाठी नवीन निविदा काढावीत आणि या रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ६ जून २०२३ रोजी ४०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन करण्यात आले होते.
सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांच्या उपस्थितीत चांदिवली विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना रुग्णालय बनवण्याच्या कामात दिरंगाई, हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई करत त्वरित नवीन निविदा काढून चांदिवली, संघर्षनगर येथील रुग्णालयाचे काम पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले.
या बैठकीत आमदार दिलीप मामा लांडे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, एसआरएचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विभागातील इतर समस्या मांडताना लांडे यांनी क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी येथील मिठी नदीकाठी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीआयएल कॉम्प्लेक्स, प्रीमियर इस्टेट, कुर्ला येथील चार इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कचरा संकलनाचा अभाव आणि सांडपाण्याचा निचरा नसणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या इमारतींमधील छतावरील गळती, लिफ्ट आणि वायरिंगबद्दल अनेक तक्रारी असल्याचा प्रश्न मांडला.
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना हे काम त्वरित पूर्ण करून तेथे पुरेसा पाणीपुरवठा तातडीने करावा, तसेच इतर सर्व समस्या त्वरित सोडवण्याचे निर्देश दिले.
तसेच पीएपी कॉलनीतील ६५० खाटांचे रुग्णालय पूर्ण झाले आहे पण वापरात नाही. हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून ते लवकरच सुरू करावे अशी मागणीही लांडे यांनी यावेळी केली.
No comments yet.