पवई तलाव ओव्हरफ्लो

उन्हाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर थोडी विश्रांती घेवून पावसाने पाठीमागील काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. दोन दिवस मुंबईत सतत सुरू असलेल्या पावसामुळे पवईतील कृत्रिम तलाव पवई तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत २० दिवस आधीच हा तलाव भरला आहे. यासंदर्भात महिती देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पवई तलाव पूर्ण भरुन वाहू लागला असल्याचे सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज पहाटे (मंगळवार) ६ वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. गेल्या दोन दिवसात तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे. सद्यस्थितीत तलावाची पाणी पातळी १९५.१० फूट इतकी आहे. अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.

२०२४ मध्ये दमदार पावसानंतर ८ जुलैला पवई तलाव भरून वाहू लागला होता. मात्र यावर्षी १८ जूनलाच तलाव भरून वाहू लागला आहे. म्हणजेच पाठीमागील वर्षाच्या तुलनेत २० दिवस आधीच तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी लाखो मुंबईकर या ठिकाणी येत असतात. आनंद घेताना कोणतीही दुर्घटना घडू नये याकरता योग्य ती काळजी, खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासन आणि पवई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पर्यावरण प्रेमींची नाराजी

पवई तलाव ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंद असला तरी पर्यावरण प्रेमी मात्र नाराज आहेत. जोरदार पावसानंतरही ऑगस्ट महिन्यात भरून वाहणारा तलाव गेल्या काही वर्षात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच ओव्हरफ्लो होत आहे. या वर्षी तर जूनच्या मध्यंतरी तेवढा मोठा पाऊस पडला नसतानाही केवळ सुरुवातीच्या पावसातच तो ओसंडून वाहू लागला असून, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

“करोडो रुपये खर्च करून पवई तलावातील जलपर्णी हटवणे, गाळ उपसण्याचे काम करण्यात आले आहे. अजूनही नवनवीन कामे सुरु आहेत. प्रत्यक्षात मात्र यातील कोणतेच काम व्यवस्थित होत नसून, तलावाची पातळी अजूनच कमी झाली आहे आणि त्यामुळे थोड्या पावसातही तलाव ओव्हरफ्लो होत आहे”, असे यावेळी बोलताना पर्यावरण प्रेमी म्हणाले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!