पवईत वृद्धाची देखभाल करणाऱ्या केअरटेकरकडून सोन्याच्या साखळीची चोरी; ८० हजारांचा ऐवज लंपास

मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या पवईतील हिरानंदानी गार्डन परिसरात एका केअरटेकर महिलेने आपल्याच ९४ वर्षीय वृद्ध मालकिणीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मधुमिता सुब्रमण्यम या हिरानंदानी गार्डन येथील ‘ग्लेन रिज’ इमारतीत परिवारासोबत राहतात. त्यांच्या समोरच्या फ्लॅटमध्ये त्यांचे ६७ वर्षीय वडील सुब्रमण्यम शर्मा आणि ९४ वर्षीय आजी विजया सुदरसनम वास्तव्यास आहेत. आजींचे वय अधिक असल्याने त्यांच्या दैनंदिन कामात मदतीसाठी एका केअरटेकरची गरज होती.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या जुन्या मदतनीस रजेवर गेल्यामुळे, सुब्रमण्यम शर्मा यांनी त्यांच्या कंपनीशी संबंधित ‘ह्युमन केअर वर्ल्ड’ (Human Care World) या मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला. कंपनीने हिरामणी खलखो (वय २९, रा. नालासोपारा) हिचे नाव सुचवले आणि तिला कामाचा चांगला अनुभव असल्याचे सांगितले. विश्वासापोटी कुटुंबाने तिला २० एप्रिल २०२६ रोजी कामावर ठेवले होते.

पहाटेच्या सुमारास चोरी आणि पलायन

सोमवारी, २७ एप्रिल रोजी पहाटे ६:०० च्या सुमारास जेव्हा सुब्रमण्यम शर्मा उठले, तेव्हा त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात मदतनीस हिरामणीचा शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही. संशय आल्याने त्यांनी तात्काळ घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये हिरामणी पहाटे ३:०० वाजता स्वतःचे सामान घेऊन घरातून बाहेर पडताना दिसली.

त्यानंतर तक्रारदार यांना त्यांच्या आजीच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाची (अंदाजे किंमत ८०,००० रुपये) सोन्याची चैन गायब असल्याचे लक्षात आले.

पोलीस तपास सुरू

याप्रकरणी तक्रारदार यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन हिरामणी खलखो विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून, आरोपी महिलेचा पत्ता आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे तिचा शोध सुरू केला आहे. तसेच, संबंधित एजन्सीने केअरटेकरची पूर्ण पडताळणी केली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

घरगुती मदतीसाठी ठेवलेल्या महिलेनेच विश्वासाला तडा देत वृद्धेच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

पवई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरात मदतनीस किंवा केअरटेकर ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती आणि पोलीस पडताळणी (Police Verification) करणे अत्यंत आवश्यक आहे.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!