जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (JVLR) रविवारी, ३ मे संध्याकाळी एका भरधाव ह्युंदाई क्रेटा कारने पादचाऱ्याना उडवल्याची भीषण घटना घडली आहे. संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास पवईतील महात्मा फुले नगरजवळ झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.
मनिषा सावंत (४४), नाथा सोपान पारगावकर (४५), आमचार पांडीयन तेवर (४०) आणि धनुष पांडीयन तेवर (१३) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून, सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्युंदाई क्रेटा कार (एमएच ४६ बीक्यू ५२८८) जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरून पूर्व द्रुतगती महामार्गाच्या (EEH) दिशेने वेगाने जात होती. आयआयटी मार्केट सिग्नल पार करताच या कारने प्रथम एका मोटारसायकलला धडक दिली आणि त्यानंतर पादचाऱ्यांना उडवत ही कार भरधाव निघून गेली. अपघात झाल्यानंतर चालकाने जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी तातडीने शोध घेत विशाल सिंधू (१९) या महाविद्यालयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात आरोपीविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवणे आणि दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आहे.
यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले कि, “आरोपी हा विद्यार्थी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने मद्यप्राशन केले होते का, हे तपासण्यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.”
पवईत अपघातांचे सत्र
काही दिवसांपूर्वीच पवईमध्ये एका भरधाव टेम्पोने तीन सफाई कामगारांना चिरडल्याची घटना घडली होती. त्या घटनेतही चालक फरार झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हिट-अँड-रनची ही घटना समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.




No comments yet.