चांदिवलीत भरदिवसा घरफोडी; ८५ हजारांचा ऐवज लंपास

चांदिवली परिसरातील ‘जंगलेश्वर मंदिर रोड’ भागात असलेल्या एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अडागळे हे कुलकर्णी वाडी येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ३० एप्रिल रोजी त्यांची पत्नी व मुलगा एका कार्यक्रमासाठी पुण्याला गेले होते. दरम्यान, १ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अडागळे स्वतः कामासाठी वलसाड (गुजरात) येथे गेले होते.

२ मे रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अडागळे यांच्या पत्नीला त्यांच्या घरमालकिणीचा फोन आला. घराचा दरवाजा उघडा असून आत सामान अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांनी सांगितले. “तक्रारदार आणि पत्नी यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता, घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर उघडे असल्याचे आणि त्यातील दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले,” असे पोलिसांनी सांगितले.

घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता.

चोरीला गेलेला मुद्देमाल: तक्रारीनुसार, चोरट्यांनी खालील वस्तूंची चोरी केली आहे:

  • ९ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत अंदाजे ४५,००० रुपये)
  • ३ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ (किंमत अंदाजे १५,००० रुपये)
  • २ ग्रॅम वजनाचे कानातील तार (किंमत अंदाजे १०,००० रुपये)
  • १५,००० रुपये रोख (५०० रुपयांच्या ३० नोटा)

एकूण ८५,००० रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केला आहे. १ मे सकाळी ७ ते २ मे संध्याकाळी ७ या दरम्यान ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अडागळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!