अहमदाबाद विमान दुर्घटना: कॅप्टन सुमित सभरवाल यांना कुटुंब आणि मित्रांनी दिला भावनिक अखेरचा निरोप

मुंबईतील पवई परिसरातील जलवायू विहार येथील निवासी इमारतीबाहेर ८८ वर्षीय पुष्करराज सभरवाल यांनी थरथरत्या हातांनी आणि ओल्या डोळ्यांनी शांतपणे उभे राहून त्यांचा मुलगा कॅप्टन सुमित सभरवाल यांना अंतिम निरोप दिला. या हृदयद्रावक भावनेने अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी सुमित सबरवाल यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांची बहिण, भाचे, कुटुंब आणि हजारोंच्या संख्येने मित्रपरिवार जमा झाला होता.

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या दुर्दैवी विमानाचे पायलट सुमित सबरवाल होते. अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लंडनला जाणाऱ्या विमानाचा काही क्षणांतच अपघात झाला होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २४२ जणांमध्ये सभरवाल यांचा समावेश होता.

या ज्येष्ठ वैमानिकाचे पार्थिव सोमवारी बहिण आणि कुटुंबाकडे सोपवण्यात आल्यानंतर, मंगळवारी सकाळच्या विमानाने त्यांचे पार्थिव त्यांची बहिण, भाचे यांनी मुंबईत आणि सकाळी ८.४५ वाजता पवई येथील त्यांच्या जलवायू विहार येथील निवासी इमारतीमध्ये आणले.

आमदार, उद्योगपतीनी वाहिली श्रद्धांजली

स्थानिक आमदार दिलीप लांडे आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी हे देखील यावेळी श्रद्धांजली वाहण्यासाठी सबरवाल यांच्या निवासी इमारतीच्या ठिकाणी पोहचले.

“खूप दुःखद, एका तरुणाचा जीव गेला. अकल्पनीय,” ज्येष्ठ उद्योगपती निरंजन हिरानंदानी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “हा एक विचार करण्याचा क्षण आहे, आपण याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. पुन्हा अशा प्रकारे जीवन जाणे आपल्याला परवडणारे नाही. कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. केवळ विमान वाहतूक क्षेत्रातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात सुरक्षितता आणि संरक्षण ही प्राधान्ये असली पाहिजेत.”

वडिलांना दुखः अनावर

“वृद्धापकाळात तो माझा आधार होता… आणि आता तो गेला आहे,” असे त्यांचे वडिल यावेळी बोलताना एका नातेवाईकाला म्हणाले.

इमारतीमधील सदस्यांनी याबाबत आवर्तन पवईशी बोलताना सांगितले की, “सभरवाल अनेकदा त्यांच्या वृद्ध वडिलांची काळजी घेण्यासाठी लवकरच निवृत्ती घेण्याबद्दल बोलत असत. ते स्वप्न, विमानासारखेच, कोसळले.”

“कॅप्टन सभरवाल यांचे हे शेवटचे विमान दुर्दैवी ठरले असेल, परंतु एक कर्तव्यदक्ष, प्रतिष्ठित आणि धैर्यवान माणूस म्हणून त्यांची आठवण त्यांना ओळखणाऱ्यांच्या हृदयात जिवंत आहे” असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.

पायलट सभरवाल यांनी एटीसीला मेडे अलर्ट जारी केला होता

कॅप्टन सुमित सभरवाल हे एक अत्यंत अनुभवी पायलट होते, ज्यांना ८,२०० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता. टेकऑफ केल्यानंतर फक्त काही सेकंदांनी सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला शेवटचा संकट संदेश (“मे डे, मे डे, मे डे) पाठवला होता. काही क्षणांनंतर, विमानाचा संपर्क तुटला आणि विमान डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले.

भक्तीवर होता विश्वास, मंदिरात अंतिम प्रार्थना विधी

“त्यांचा व त्यांच्या परिवाराचा भक्तीवर ठाम विश्वास होता. कुठेही बाहेर जाण्यापूर्वी ते येथे असणाऱ्या मंदिरात दर्शनाला येत असत. त्यामुळे अंतिम यात्रेपूर्वी त्यांचे पार्थिव येथे असलेल्या मंदिराच्या प्रांगणात ठेवण्यात आले.” असे येथील रहिवाशांनी सांगितले. येथे एक प्रार्थना विधी आयोजित करण्यात आला होता जिथे दुःखाच्या ओझ्याखाली मंदपणे मंत्रोच्चार करण्यात आले.

शेजारी राहणाऱ्या पैकी बरेच जण त्यांना लहानपणापासून ओळखत होते, ते थरथरत्या आवाजात बोलत होते. “हे कुटुंब अनेक दशकांपासून येथे आहे. आम्हाला विश्वास आहे की त्याने प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी सर्व काही केले असेल. तो एक नायक होता.”

चकाला येथे पार पडला अंत्यसंस्कार

१० वाजण्याच्या सुमारास पायलटची अंत्ययात्रा पवईहून चकाला विद्युत स्मशानभूमीसाठी निघाली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावरती कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!