मी लंडनला पोहचलो की फोन करेन ९० वर्षाच्या वडिलांना शेवटचा फोन
गुरुवार, १२ जून रोजी दुपारी १:३८ वाजता गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनाग परिसरात २४२ प्रवाशांसह लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळून अपघात झाला. विमान इतिहासातील हा सर्वात मोठा आणि वाईट अपघात असून, या अपघातात वैमानिक, पवईतील रहिवासी कॅप्टन सुमित सभरवाल (५६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) नुसार, सबरवाल हे उड्डाण अनुभव असलेले अनुभवी वैमानिक होते. ते दोन दशकांहून अधिक काळ एअर इंडियासोबत होते आणि २०१२ मध्ये विमान देशाच्या प्रमुख वाहकात समाविष्ट झाल्यापासून एअर इंडियासाठी ड्रीमलाइनर उड्डाणे चालवणाऱ्या निवडक वैमानिकांपैकी ते एक होते.
सुमित सभरवाल (५६) हे पाठीमागील जवळपास दशकभरापासून पवईतील, जलवायू विहार येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात त्यांचे ९० वर्षीय वृद्ध वडील पुष्कर राज आहेत जे त्यांच्यासोबत राहत. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या आईचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर त्यांचे वडील अत्यंत धक्क्यात आहेत.
याच इमारतीमध्ये राहणारे कमांडर संजय सिंग म्हणाले, “सुमित एक आनंदी आणि आई – वडिलांची काळजी घेणारा मुलगा होता. आपल्या वृद्ध वडिलांसोबत राहता यावे म्हणून तो इथे वडिलांसोबत राहत होता.”
अजून एका रहिवाशाने सांगितले की, “लवकरच तो निवृत्ती घेवून आपल्या वडिलांसोबत पूर्ण वेळ घालवणार होता. आमच्या इमारतीतील आम्ही सर्वजण त्याला मिस करू.”
या घटनेनंतर गुरुवारी संध्याकाळी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी सुमित सभरवाल यांच्या घरी जात त्यांच्या ९० वर्षीय वडिलांची भेट घेतली.
यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “लंडनला जाण्यापूर्वी सुमितने त्यांच्या वडिलांना फोन केला होता. बोलणे झाल्यावर लंडनला पोहोचल्यानंतर मी तुम्हाला फोन करेन, असे त्यांनी आपल्या वडिलांना सांगितले होते. मात्र दुर्दैवी घटनेने त्यांचा हा अखेरचा फोन कॉल ठरला.
No comments yet.