गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या चांदिवली, संघर्षनगर येथील महापालिका रुग्णालयाचा संघर्ष संपला आहे. मंगळवार, ६ जूनला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले. या रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, २५० खाटांचे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधायुक्त १२ मजली रुग्णालय आणि क्रीडा संकुलाचे भूमिजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. या रुग्णालयामुळे पवई, चांदिवलीसह आसपासच्या परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील केईएम, सायन, नायर, कूपर या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर असलेला ताण कमी करण्यासाठी पालिकेतर्फे प्रयत्न सुरु असतानाच याचाच एक भाग म्हणून चांदिवलीतील हे सुसज्ज सुपर स्पेशालिटी रुग्णालय येत्या काळात उभे राहणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, आमदार भरत गोगावले, आमदार दिलीप लांडे, लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पाठीमागील दीड दशकापासून चांदिवली परिसरात रुग्णालयाची मागणी रहिवाशांकडून होत होती. नागरिकांच्या या मागणीचा विचार करत स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी पाठपुरावा करत मुद्दा लावून धरला होता. सतत पाठपुरावा करून काहीच हालचाल दिसत नसल्याने त्यांनी रुग्णालयासाठी आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालत केंद्राकडे पाठपुरावा करत आयुक्तांना रुग्णालयाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते.
चांदिवली, संघर्षनगर येथे रुग्णालय बांधकामासह अग्निशमक-अग्निरोधक यंत्रणा, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, वैद्यकीय गॅस यंत्रणा, डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी वसाहती अशा विविध सुविधांचा समावेश येथे असणार आहे. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसाठी १५ मजली, १९ मजली आणि १७ मजली अशा ३ विंग बांधण्यात येणार आहेत.
पुढील तीन वर्षांत रुग्णालयाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असून, इमारत बांधून रुग्णांच्या सेवेत आल्यापासून पुढील ८ वर्षें रुग्णालय इमारत व कर्मचारी वसाहत इमारतींची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले कि, संघर्षनगर परिसरात मूलभूत सोयीसुविधा पुरवून ते सुंदर नगर बनवण्याचे काम सुरु आहे. असल्फा व्हिलेज येथील ४८ कुटुंबांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले तसेच नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत आयोजित या कार्यक्रमात नंदेश उमप व सहकाऱ्यांनी नंदेश रजनी हा कार्यक्रम सादर केला.
No comments yet.