पवई आणि मरोळ यांना जोडणारा महत्वाचा दुवा असणारा मारवाह रोड अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ३ वर्षाचा दीर्घ कालावधी आणि ३ अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर आणि शिवसैनिकांच्या दणक्यानंतर अखेर बुधवार, १० जुलैपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
पवईवरून मरोळ, एमआयडीसीकडे जाण्यासाठी मारवाह पुलामार्गे शोर्टकट आहे. अवघ्या ५ मिनिटात या मार्गाने मरोळ आणि पुढे एमआयडीसी, महाकाली या ठिकाणी पोहचता येते. पालिकेने ऑक्टोबर २०१८मध्ये पुलाच्या विस्ताराचा विचार सुरू केला होता. मात्र दुरुस्ती दरम्यान पुलाच्या भिंतीचा भाग कोसळल्याने आणि पुलाला तडे गेल्याने पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दुरुस्तीसाठी येणारा १४.२२ कोटी रुपये खर्च वाढून २६.०७ कोटीवर पोहचला.
पुढे कामादरम्यान जलविभागाच्या पाण्याच्या लाईन्स आणि टाटा आणि अदानी यांच्या उच्च दाबाच्या विद्युत लाईन्सचे मोठे जाळे नियोजित जागेत असल्याचे समोर आले. पुलाची लांबी ३.१० मीटरने वाढवण्यासाठी ३.३७ कोटी रुपयांच्या खर्च वाढीनंतर २९. ४४ कोटीवर पोहचली. २०२१ साली सुरु झालेल्या पुलाच्या पुनर्निर्मितीच्या कामाची आधीची डिसेंबर २०२३ ची मुदत वाढवून मे २०२४ पर्यंत करण्यात आली होती.
३ वर्षापासून सातत्याने रखडत चालेलेले काम आणि २ मुदतवाढ संपून देखील २ जून २०२४ पर्यंत काम पूर्ण झालेले नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक होत अशोक माटेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी कंत्राटदाराचे कार्यालय आणि जेसीबी तोडले होते. यावेळी पालिका आणि कंत्राटदार दोघानाही लवकरात लवकर हे काम पूर्ण करा अन्यथा पालिकेच्या कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला होता.
शिवसेनेच्या आंदोलनानंतर ३१ जून २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपून देखील दिरंगाई होत असल्याने शिवसैनिकांनी पुन्हा इशारा देताच अखेर १० जुलैला हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते विधानसभा प्रमुख अशोक माटेकर, माजी नगरसेविका अश्विनी माटेकर, मरोळ रहिवासी संघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकांच्या उपस्थित या पुलाचे उद्घाटन पार पडले.
No comments yet.