आपल्या सहकारी मैत्रिणीसोबत बलात्कार करणाऱ्या एका इसमाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इसाकी हरिश्चंद्र पांडीधर (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या महिलेशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी इसाकी आणि तक्रारदार महिला हे दोघेही एकाच लॅबमध्ये काम करतात. लॅबमध्येच त्यांची ओळख झाली होती. ओळखीनंतर दोघांच्यामध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. “विविध कारणास्तव इसाकी तक्रारदार महिलेला भेटण्यासाठी बोलावत असे. पाठीमागील आठवड्यात असेच दोघे एकमेकांना भेटलेले असताना आरोपीने तिला पवई येथील लेकसाईट हॉटेलमध्ये घेवून जात तिच्यावर बलात्कार केला असल्याची तिने तक्रार दिली आहे,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
“यासंदर्भात महिलेने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर केलेल्या चौकशीत आम्हाला लेकसाईट हॉटेलमध्ये आरोपीच्या नावे ३ नोंदी मिळून आलेल्या आहेत. तसेच इतर पुराव्यांच्या आधारावर आम्ही त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.” असेही याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
No comments yet.