आयआयटी येथील रिलायन्स एनर्जींचे एकमेव वीजबिल भरणा केंद्र कंपनीने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन लोक त्रस्त झाले होते. या त्रासाबद्दल लक्षात येताच शिवसेनेतर्फे वीजबिल भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम घेत हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात यावे म्हणून गुरुवारी केंद्राच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक व शिवसैनिकांनी यात सहभाग घेतला होता.
काही दिवसांपूर्वी रिलायन्स एनर्जीने त्यांचे आयआयटी पवई येथील वीजबिल भरणा केंद्र स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केले होते. याबाबत स्थानिकांनी होणाऱ्या गैरसोईबद्दल रिलायन्स कंपनीचे लक्ष वेधल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी कंपनीने आपल्या ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी काही बँकांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली होती.
“बँकांमध्ये बिल भरणा करताना प्रचंड ताण सोसावा लागत आहे. काही ठराविक दिवसांपुरतीच ही सोय असल्याने सदर सुविधा प्रचंड वेळखाऊपणाची ठरत आहे, त्यामुळे वीज बिल भरणा केंद्र पुन्हा पूर्ववत करावी अशी आमची मागणी आहे” असे यावेळी बोलताना आंदोलकांनी सांगितले.
“आम्ही सतत रिलायन्स कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून प्रश्न सोडविण्याबाबत प्रयत्न करीत आहोत. आज आम्ही आमची आंदोलनाच्या रूपातून आमची मागणी ठेवल्यानंतर त्यांनी लवकरच पुन्हा हे केंद्र सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र लोकांच्या गरजा लक्षात घेता रिलायन्स एनर्जीने येथील वीज बिल भरणा केंद्र पूर्ववत करुन नागरिकांना दिलासा न दिल्यास आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू,” असे याबाबत बोलताना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी सांगितले.
No comments yet.