कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलेला असताना कोरोना वॉरिअर्स असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पोलीस असा सगळ्यांबद्दल जनमानसात एक मोठा आदर निर्माण झाला आहे. याचेच एक उदाहरण काल, ४ मे रोजी पवईत पहायला मिळाले. एका तरुणीने आपल्या वाढदिवसाचा आनंद चक्क पवई पोलिसांसोबत साजरा केला.
पवईत राहणाऱ्या मलकावा बोमिडी या तरुणीचा ४ मे रोजी जन्मदिवस होता. आपल्या या आजच्या जन्मदिनी या कोरोना संकटाच्या काळात आपण सुरक्षित असण्याचे मोठे श्रेय हे कोरोना वॉरिअर्सचे आहे, हे लक्षात घेता त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिने आपला हा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले.
“हे सर्व पोलीस आपल्या परिवारापासून आणि परिवारातील आनंदापासून दूर राहून आपल्याला कोणतीही झळ किंवा दु:ख पोहचू नये म्हणून दिवसरात्र झटत आहेत. या काळात त्यांना काही आनंदाचे क्षण मिळाले तर ते त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देणारे ठरतील, हाच उद्देश समोर ठेवत मी त्यांना माझ्या आनंदात सहभागी करत आनंद देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.” असे याबाबत बोलताना मलकावा हिने सांगितले.
उडान इंडिया फाउंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेसाठी मलकावा काम करते. संस्थेत काम करत असताना, नेहमीच लोकांसाठी काम करणे आणि लोकांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करणे याचे धडे तिला मिळतात. याच विचाराने प्रेरित होऊन आपल्या आरोग्यासाठी प्रत्येक रूपात कार्यरत आहेत अशा खऱ्या आयुष्यातील या नायकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा तिच्या मनात होती.
“मी माझ्या काही विद्यार्थ्यांच्या मदतीने आणि मित्रांकडून त्यांचे आभार मानणारे संदेश एकत्रित केले आणि कार्डांवर लिहिले. हेच कार्ड मी त्यांना यावेळी दिले. तसेच माझ्या जन्मदिनी मी घरात बनवलेला केक कापून पोलिसांसोबत आनंद साजरा केला,” असेही मलकावा म्हणाली.
“आमच्यातील अनेक कर्मचारी कोरोनाशी हे युद्ध सुरु झाल्यापासून आपल्या घरी गेलेले नाहीत. घरी गेले तरी आपल्या परिवारात मिसळत नाहीत, कारण त्यांना कोरोना संसर्गाचा धोका पोहचू नये. पण अशावेळी आम्ही कर्तव्यावर असणाऱ्या ठिकाणी आमचा जो परिवार तयार झाला आहे तो आमच्या सोबत आपले आनंदाचे क्षण साजरे करतो यापेक्षा वेगळा आनंद तो काय”, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
[…] […]