पवई पोलिसांची मोठी कारवाई: पवई लेक परिसरात तरुणाकडून २ पिस्तूलं आणि जिवंत काडतूसं जप्त

पवई लेक परिसरात रात्रीच्या शांततेत शस्त्रांची विक्री करण्याचा प्रयत्न पवई पोलिसांनी हाणून पाडला आहे. पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (Detection Team) सापळा रचून हरियाणातून आलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून दोन बनावट पिस्तूलं आणि ६ जिवंत काडतूसं जप्त केली आहेत. प्रदीप संतोष सिंह (वय २३, राहणार – हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

शनिवारी (२० डिसेंबर) रात्री पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक गस्तीवर असताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती. पवई लेक परिसरात एक इसम बेकायदेशीर अग्निशस्त्रे घेऊन येणार असल्याची ती खबर होती. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड आणि त्यांच्या पथकाने तात्काळ पवई लेक व्ह्यू गार्डन, मेजवानी रेस्टॉरंट परिसरात साध्या वेशात सापळा रचून पाळत ठेवली.

सापळा आणि अटक:

रात्री साधारण १ वाजण्याच्या सुमारास, मेजवानी रेस्टॉरंटच्या विरुद्ध बाजूला एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना पथकाला दिसला. त्याच्या पाठीवर एक बॅग होती. पोलिसांना पाहताच त्याची हालचाल बदलली, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले.

पंचांच्या उपस्थितीत जेव्हा त्याची झडती घेण्यात आली, तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. “त्याच्या बॅगेतील कपड्यांच्या थरामध्ये दोन लोखंडी बनावटीची पिस्तूलं दडवून ठेवली होती. इतकेच नव्हे तर बॅगेत एका प्लास्टिक पिशवीत ६ जिवंत काडतूसंही आमच्या पथकाला मिळून आली,” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.

पोलीस चौकशीत तरुणाने आपले नाव प्रदीप संतोष सिंह (वय २३) असे असून तो हरियाणा येथील रहिवाशी असल्याचे सांगितले.

मोठा मुद्देमाल जप्त:

पोलिसांनी या कारवाईत अंदाजे १ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये: दोन बनावट पिस्तूलं (किंमत १ लाख रुपये), ६ जिवंत काडतूसं (७.६५ एमएम), एक सॅमसंग मोबाईल आणि अमेरिकन टुरिस्टरची बॅग.

विक्रीसाठी आला होता मुंबईत

प्राथमिक चौकशीत आरोपीने कबुली दिली की, ही शस्त्रे तो मुंबईत विक्रीसाठी घेऊन आला होता. त्याच्याकडे शस्त्रांचा कोणताही परवाना नव्हता. पवई पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह मुंबई पोलीस कायदा ३७ (१) (अ), १३५ अन्वये नुसार गुन्हा नोंद करून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता मंगळवार, २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त (परीमंडळ १०) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) प्रदीप मैराळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशांत बंडगर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड, पोलीस हवालदार चव्हाण, सुरनर, पोलीस शिपाई वारंग, राठोड आणि शिरसाट यांच्या पथकाने सदर कारवाई केली.

पवई पोलीस आरोपीने अग्निशस्त्रे आणि काडतुसे कुठून आणली आणि मुंबईत कोणाला विकण्यासाठी आला होता याचा शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!