रामबाग येथील कचरा कुंडी फुटल्याने हटवण्यात आलेला कचऱ्याच्या डब्ब्याच्या जागी ठेवण्यासाठी नवीन डब्बा पालिकेला मिळत नसल्याने रामबागची कचराकुंडी झाली आहे. परिसरात कचरा कुंडी नसल्याने नागरिक आणि सफाई कर्मचारी अक्षरशः रस्त्यावर कचरा फेकत असल्याने संपूर्ण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे.
पवईतील रामबाग भागात असणाऱ्या चाळसदृश्य वस्त्या आणि इमारतींमधून निघणारा कचरा एकत्रित करण्यासाठी क्रिस्टल पलेस इमारतीसमोर डीपी रोड ९ किनारी असणाऱ्या मोकळ्या जागेत कचराकुंडी ठेवण्यात आली होती. मात्र ही कचराकुंडी तुटल्याने यातील कचरा रस्त्यावर आणि बाहेर मोकळ्या जागेत पडून घाण निर्माण होवून दुर्गंधी येत होती. यासंदर्भात चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनने ३० नोव्हेंबरला पालिकेकडे तक्रार केल्यानंतर सदर कचरा कुंडी हटवण्यात आली आहे.
कचराकुंडी हटवल्यानंतर पालिकेने १ डिसेंबरला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे, “Sir, Your Complaint has been attended by our team. Once one point one garbage bin will be available, we will install it in the same place. Thanks for interacting with us!” म्हणजेच तुमच्या तक्रारीची आमच्या टीमने दखल घेतली आहे. कचरापेटी उपलब्ध होताच आम्ही ती त्याच ठिकाणी पुन्हा स्थापित करू. मात्र याला १० दिवस उलटले तरी तिथे कचरा कुंडी ठेवण्यात आलेली नाही. यामुळे पालिकेला अजून कचरा कुंडी मिळाले नसल्याचे दिसत असून, यामुळे नागरिक त्याच ठिकाणी उघड्यावर कचरा टाकत आहेत.
यासंदर्भात बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले कि, “कचरा पेटी तिथून हटवून जवळच असणाऱ्या कंटेनरच्या पाठी टाकण्यात आली आहे. कचराकुंडी नसल्याने इमारतीमधील कचऱ्याचे डब्बे, चाळसदृश्य वास्त्यांमधील कचरा तसेच येथील दुकानांमधून निघणारा कचरा इथेच उघड्यावर फेकला जात आहे. पालिकेच्या गाडीने तो कचरा उचलला तर बरे नाहीतर २ – २ दिवस कचरा तसाच उघड्यावर पडून राहत आहे. त्यातून दुर्गंधी येत असून, मच्छर परिसरात वाढत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “पूर्वी हा डब्बा नागरी वस्तींपासून दूर मोकळ्या जागेत ठेवण्यात आला होता. मात्र हळू हळू सरकवत तो वस्तीजवळ आणून ठेवण्यात आला होता. आता त्याचजागी उघड्यावर कचरा फेकला जात असल्याने नागरिक अधिक त्रस्त आहेत. पालिकेने लवकरात लवकर कचरा कुंडी यापूर्वीच्या ठिकाणी स्थापित करावी अशी आमची मागणी आहे.”
यासंदर्भात आवर्तन पवईने पालिकेला तक्रार केली असता त्यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही.
No comments yet.