जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरून रिक्षातून जाताना मोबाईल चोरून पळालेल्या चोराचा पाठलाग करून एका मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने चोराला फिल्मी स्टाईलने पकडले. सुधांशू निवसरकर ऑटोरिक्षाने आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली. त्यांनी त्या चोराला पकडून पवई पोलिसांना सुपूर्द केले आहे. सागर ठाकूर (३२) असे अटक आरोपीचे नाव आहे.
चांदिवली येथे राहणारे सुधांशू निवसरकर हे बुधवारी सायंकाळी गोरेगाव येथून ऑटोरिक्षाने घरी परतत होते. त्यांची रिक्षा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडमार्गे पवई येथील नॅशनल सिक्युरिटी गार्ड बेसजवळ पोहचल्यानंतर तेथील वाहतूक कोंडीत अडकली.
“निवसरकर रिक्षात बसलेले असताना त्यांच्या हातातील मोबाईल अचानक एका तरुणाने खेचून तेथून पळ काढला. निवसरकरानी क्षणाचाही विलंब न करता रिक्षातून उतरून त्याचा पाठलाग सुरु केला. काही अंतरावरच त्यांनी त्याला पकडलेच होते मात्र चोराने त्यांना जोरात धक्का देवून पुन्हा पळ काढला,” असे पोलिसांनी सांगितले.
निवसरकर यांनी हार न मानता पुन्हा त्याचा पाठलाग सुरु केला. पाठलाग सुरु असतानाच आरोपी धडपडत खाली पडला आणि त्यांनी संधी साधत त्याला पकडले. याचवेळी काही वाटसरूही त्यांच्या मदतीसाठी धावले आणि त्यांनी चोराला पकडून ठेवण्यात मदत केली.
निवसरकर यांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देताच पवई पोलिसांची गस्तीवरील एक गाडी तिथे पोहचत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून फोन जप्त केला.
पवई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार चोरीचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी सागर अशा आणखी गुन्ह्यात सहभागी आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.