पवईत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या सहावर

पवई पोलिसांच्या हद्दीतील मरोळ भागात सुद्धा एक पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आला असल्याने आता पवई पोलिसांच्या हद्दीतील रुग्णांची संख्या ७ वर गेली आहे. पैकी २ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, तर ५ रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यातील एकाचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

कोरोना पॉझिटिव्हपवईतील कोरोना (कोविड १९) बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पवईतील चाळसदृश्य लोकवसाहतीमध्ये गुरुवार, ०९ एप्रिलला अजून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आला आहे. याच भागात पूर्वी पॉझिटिव्ह मिळून आलेल्या ३४ वर्षीय रुग्णाची ती पत्नी आहे. यामुळेच पवईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६ झाली आहे. पालिकेने आसपासचा परिसर आधीच सील केला असून, नागरिकांची वर्दळ रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पवईत सुरुवातीला उच्चभ्रू वस्तीत राहणारी आणि परदेशी प्रवास करून आलेली ४४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह मिळून आली होती. त्यानंतर आयआयटी पवई येथील रहिवाशी इमारती असणाऱ्या भागात एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. या तरुणाचा सुद्धा परदेश प्रवासाचा इतिहास आहे. याचवेळी येथीलच चाळ सदृश्य लोकवसाहतीतील एका व्यावसायिकाला कोरोना झाल्याचे समोर येताच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आता याच वसाहतीमधील एकाच कुटुंबातील दोघे आणि पूर्वी पॉझिटिव्ह मिळून आलेल्या रुग्णाची पत्नी कोरोना बाधित असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

लोकवस्तीमध्ये कोरोना विषाणूंच्या प्रसाराची शक्यता पाहता ३५ घरांची संपूर्ण लोकवस्ती सील करत नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. रुग्णाच्या निकटवर्तीयांचे स्वाब घेण्यात आले होते. “या वस्तीतील सुरुवातीला पॉझिटिव्ह मिळालेल्या रुग्णाच्या पत्नीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली होती, मात्र ती एका खाजगी कोरोना रुग्णालयात भरती झाली आहे,” असे याबाबत बोलताना पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

“पॉझिटिव्ह महिलेला पालिका अधिकाऱ्यांनी येवून रुग्णालयात घेवून जाणे अपेक्षित आहे. मात्र, पालिका प्रशासनाचे कोणीच येथे उपस्थित नव्हते. महिलेच्या नातेवाईकांनी मध्यरात्री सील केलेल्या परिसरात प्रवेश करत, आवश्यक ती खबरदारी न घेता तिला येथून घेवून गेल्याने आम्हाला सुद्धा धोका वाढला आहे,” असे याबाबत बोलताना या लोकवसाहतीतील नागरिकांनी सांगितले.

नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “प्रशासकीय यंत्रणेकडून निष्काळजीपणा झाला आहे हे खरे आहे, मात्र ही वेळ त्यांना दोष देत बसण्याची नाही. त्यांनी इथून पुढे तरी खबरदारी घ्यावी म्हणून मी सर्व वरिष्ठांशी बोललो आहे.”

चाळ सदृश्य भागात सर्वात जास्त केसेस

सध्या पवईतील सर्वात जास्त केसेस या चाळसदृश्य मोठी लोकसंख्या असणाऱ्या लोकवस्तीत आहेत. त्यामुळे काळजी नाही घेतली तर धारावी सारखी अवस्था होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अशी विनंती सुद्धा यावेळी त्रिपाठी यांनी केली.

पवई पोलिसांच्या हद्दीतील मरोळ भागात सुद्धा एक पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आला असल्याने आता पवई पोलिसांच्या हद्दीतील रुग्णांची संख्या ७ वर गेली आहे. पैकी २ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, तर ५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ५ पैकी एका रुग्णाचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह येताच त्यालाही घरी सोडण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!