पवईतील हिरानंदानी परिसरात स्थानिक भागात फिरत आहात आणि वाहतूक पोलीस नसतात म्हणून वाहतुकीचे नियम मोडत वाहन चालवत असाल तर सावधान! हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर असणाऱ्या वन वे रस्त्यांवर वाहतूक पोलिसांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतूक पोलिसांतर्फे ई चलन द्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे.
चार वर्षापूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी ई-चलन प्रणाली सुरु करण्यात आली होती. मुंबईच्या मुख्य रस्त्यांवर अंमलात आणली जाणारी ही प्रणाली आता सगळीकडे पोहचू लागली असून, पवईतील हिरानंदानी भागात सुद्धा वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर असणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे.
कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे घरात अडकून पडलेले मुंबईकर आता कामानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत. मात्र यावेळी अनेकदा स्थानिक भागात फिरताना वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहने चालवली जात आहेत. मात्र तुम्ही पवईमध्ये वाहतुकीचे नियम न पाळता फिरत असाल तर सावधान. पवईतील हिरानंदानी भागात वाहतूक पोलिसांतर्फे सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, याच्या माध्यमातून केवळ आठवड्याभराच्या आत २५०० पेक्षा अधिक वाहनचालकांना दंड आकारण्यात आला आहे. याबद्दल साकीनाका वाहतूक विभागाने पुष्टी करतानाच तशा सूचना परिसरात लावल्या असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक बोलताना साकीनाका वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “येथील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर काही भागात रस्ते हे वन वे करण्यात आले आहेत. काही भागात नो पार्किंग करण्यात आले आहे तशा सूचना देखील तिथे लावण्यात आलेल्या आहेत. मात्र, वाहनचालक सर्रासपणे वाहतूक नियम मोडत असल्याचे आढळून येत आहे. वाहतूक पोलिसांतर्फे वेळोवेळी अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाते आहे. मात्र वाहतूक पोलीस नाहीत हे पाहून नागरिक नियम मोडत परिसरात वाहतूक कोंडी निर्माण करत असतात.”
हिरानंदानीतील सायप्रेस इमारत ते ब्लू बेल या भागात रहिवाशांच्या मागणीवरून आणि निर्माण होणारी वाहतुकीची समस्या लक्षात घेता वाहतूक विभागातर्फे हा मार्ग वन वे करण्यात आला आहे. तरीही वाहनचालक नियम मोडून या मार्गात घुसून वाहतूक कोंडी निर्माण करत असल्याने रोटरी क्लबतर्फे येथे सुरक्षारक्षक, ट्राफिक वॉर्डन सुद्धा तैनात करण्यात आले होते. मात्र त्यांना न जुमानता वाहनचालक जबरदस्ती या मार्गात घुसत असल्याने ठोस पाऊले उचलण्याची विनंती वाहतूक विभागाला स्थानिक नागरिकांतर्फे करण्यात आली होती.
यासंदर्भात स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर येथे कायमस्वरूपी बीट देण्यासोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी येथे सीसीटीव्ही सुद्धा बसवण्यात आले आहेत.
“सीसीटीव्ही लावल्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास ७०० नागरिकांना ई-चलन देण्यात आले आहे. तर केवळ आठवड्याभरात २५०० पेक्षा अधिक लोकांना ई-चलन आकारण्यात आले आहे,” असे याबाबत बोलताना साकीनाका वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.