@अविनाश हजारे
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मुंबईसह महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहेत. पवई येथे देखील ‘ईशान्य मुंबई पत्रकार असोसिएशन’ पुरस्कृत पवई दैनिक पत्रकार संघाच्यावतीने निषेध व्यक्त करत पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले. हल्लेखोरांवर कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी निवेदनातून वरिष्ठ पोलिसांमार्फत मुख्यमंत्रांकडे मागणी करण्यात आली आहे.
पुणे येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून ते थोडक्यात बचावले असून, अशा प्रकारे एका ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला होणं ही बाब निकोप लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी ठरत आहे.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर हल्ले होत असतील तर ही लोकशाहीची क्रुर विटंबना आहे. असे हल्ले रोखण्यासाठी आरोपींवर कठोरात कठोर शासन होणे गरजेचे आहे, असे ईशान्य मुंबई पत्रकार असोसिएशनने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ईशान्य मुंबई पत्रकार असोसिएशनचे रामकृष्ण खंदारे, मुकेश त्रिवेदी, प्रमोद चव्हाण, प्रशांत वायदंडे, अविनाश हजारे, रविराज शिंदे, रमेश कांबळे, तुषार विरकर, आनंद इंगळे, गौरव शर्मा आणि आकाश पगारे आदी. उपस्थित होते.
No comments yet.