कोरोना व्हायरसच्या उद्रेक दरम्यान पवईतील विविध भागात सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या प्रयत्नाने शनिवारी पवईत ही फवारणी करण्यात आली.
शनिवारी एकाच दिवसात देशात १४,५१६ नवीन कोविड-१९ प्रकरणांची नोंद झाली. ज्यामुळे शनिवारी बाधितांची संख्या ३,९५,०४८ वर पोहचली होती. ज्यापैकी २.१ लाख रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतही कोरोनाने थैमान घातले असून, पालिका एस विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात बाधित मिळून आले आहेत.
पालिका एस विभागात पवईचा सुद्धा समावेश आहे. या भागात मिळणारे रुग्ण आणि अनलॉकनंतर परिसरात बाहेरून कामानिमित्त येणारे मुंबईकर आणि बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शनिवार २० जून रोजी स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या प्रयत्नाने सॅनिटायझेशन करण्यात आले.
पवईतील विविध भाजी मंडई, मासळी बाजार, चैतन्यनगर, रमाबाई नगर, पद्मावती देवी मार्ग, भवानी शंकर मार्ग, अपना बाजार लेन, हिरानंदानी कॉम्प्लेक्स, विलगिकरण क्षेत्र, सेहगल वाडी, तिरंदाज व्हिलेज, साईनाथ नगर अशा विविध भागात सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
“कोरोना बाधित रुग्ण मिळत असणाऱ्या परिसरात माणसांच्या साहय्याने निर्जंतुकीकरण केले जात आहे. मात्र अनलॉकनंतर खूप मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले आहेत, यामुळे रस्ते आणि मोठमोठे परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी मानवी वापर शक्य नाही आहे. सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्याचा हा मार्ग खरच खूप प्रभावी आहे. पालिका किंवा स्थानिक प्रतिनिधींनी याचा वेळच्या वेळी वापर करायला हवा,” असे याबाबत बोलताना पवईकरांनी सांगितले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.