@अविनाश हजारे | बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस विभागाचे’ सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांच्या बदलीनंतर बरेच दिवस रिक्त असणाऱ्या सहाय्यक आयुक्तपदी विभास आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
एस विभाग प्रशासनाच्या हद्दीत मुख्यत्वे पवई, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर आदी. परिसर येतात.
पालिका ‘एफ साऊथ’ ( परेल) विभागात ते यापूर्वी कार्यरत होते. आचरेकर यांना हा विभाग नवीन असला तरी, यापूर्वी प्रशासकीय कामकाजाचा असलेला अनुभव पाठीशी घेऊन त्यांनी ‘एस’ विभागात कामाची सुरुवात केली आहे. हद्दीतील उपनगरांमध्ये विविध उपक्रम व योजनेच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करणार असल्याचा विश्वास आचरेकर यांनी ‘आवर्तन पवई’शी बोलताना व्यक्त केला.
हा संमिश्र लोकवस्ती असलेला विभाग असून, यात पवई, हिरानंदानी कॉम्प्लेक्स सारख्या परिसरात गगनचुंबी टॉवर्स सह सोसायट्या तर इतर भागात लहान- मोठ्या इमारतीत राहणाऱ्या लोकांबरोबरच चाळसदृश्य वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. यामुळेच प्रत्येक ठिकाणानुसार बदलणाऱ्या प्राथमिक सुविधा पुरविण्यावर पालिकेला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा, सार्वजनिक शौचालये, सुसज्ज असे खड्डेमुक्त रस्ते आणि फुटपाथ, आरोग्य सुविधा, खेळाचे मैदान आदींचे देखील त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात एकेकाळी पहिल्या ४ मध्ये पोहचलेल्या या विभागात कोरोना नियंत्रण आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सारख्या उपक्रमांना राबवण्याची एक मोठी जबाबदारी त्यांना या विभागात पार पाडायची आहे.
विभास आचरेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एस विभाग कार्यालयातील कर्मचारी वृंदांनी त्यांचे स्वागत केले व पुढील प्रशासकीय कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.
No comments yet.