साकीनाका येथील एका २३ वर्षीय महिलेला तिच्या बहिणीच्या बँक खात्यात नॉमिनी नोंद करून देण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने १.८८ लाखाची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने तो बँकेचा प्रतिनिधी असल्याचा दावा केल्याने महिलेचा विश्वास बसल्याचा फायदा घेत सायबर चोरांनी तिच्या खात्यातून पैसे काढले.
काही दिवसांपूर्वी तक्रारदार महिलेच्या १८ वर्षाच्या बहिणीला अमित मिश्रा नामक एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने तिला आपले खाते ब्लॉक केल्याचे सांगत ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी त्या खात्यास नामनिर्देशित (नॉमिनी) भरण्यास सांगितले.
काही दिवसातच तक्रारदार महिलेला मिश्राचा फोन आला. त्याने तिला सांगितले की आपण एका राष्ट्रीयकृत बँकेकडून बोलत असून, तिला आपल्या बहिणीचे बँक खात्यात नामांकन म्हणून जोडण्यासाठी त्याने कॉल केला आहे.
त्यानंतर मिश्रा यांनी तक्रारदार यांना खाते क्रमांक, एटीएम कार्ड नंबर आणि वन टाईम पासवर्ड (ओटीपी) यासारख्या माहितीची विचारणा केली. सर्व तपशील मिळवल्यानंतर ही प्रक्रिया थोड्याच वेळात पूर्ण होईल आणि कॉल संपुष्टात आला.
तिच्या खात्यातून ९९,९९९ रुपये काढल्याचा एसएमएस अलर्ट मिळाल्यावर महिलेला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यानंतर ८८,९९९ रुपये काढल्याचा दुसरा संदेश तिला आला. तिने लगेच मिश्राला कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन बंद होता.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच महिलेने साकीनाका पोलिस स्टेशन गाठले आणि ऑनलाइन फसवणुकीची तक्रार दाखल केली.
या संदर्भात साकीनाका पोलीस फसवणुकीचा गुन्हा नोंद करून, कॉलरचा तपशील तसेच त्याच्या बँकेचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
No comments yet.