ईमेल खाते हॅक करून २ जणांना १.७ लाखाचा गंडा

७२ वर्षीय पवईकराचा इमेल हॅक करून ‘सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अडकला आहे’ असे त्याच्या यादीतील लोकांना सांगून १.७ लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. संकटात अडकलेल्या आपल्या मित्राला मदत करण्याच्या प्रयत्नात दोन लोकांची यात फसवणूक झाली आहे. मरोळ येथील एका खासगी कंपनीत नोकरी करणारे सुधाकर पटनायक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील एका बँक खात्यात ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.

पटनायक यांच्या एका मित्राने त्यांना फोन करून तुला किती पैशांची आवश्यकता आहे? असे विचारल्यानंतर पटनाईक बुचकळ्यात पडले. त्यांच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तपासून पाहिले असता त्याचे ईमेल खाते हॅक झाल्याचे समोर आले. मी मित्राला काहीही पैसे ट्रान्सफर करू नको असे सांगितले आणि पैसे नभरण्यासाठी त्वरित व्हाट्सएपवर माझ्या संपर्कांतील लोकांना सतर्क केले, असे पटनायक यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

दुसर्‍याच दिवशी त्यांच्या हैदराबाद येथील एका नातेवाईकाने फोन करून ईमेल मिळाल्यानंतर विनय कुमार नामक व्यक्तीच्या खात्यात १ लाख रुपये हस्तांतरित केले असल्याची माहिती दिली. तर पुण्यातील मित्राने त्याच खात्यात ७० हजार रुपये ट्रान्सफर केले असल्याचे सांगितले.

यासंदर्भात पोलिसांनी बोलताना सांगितले की, “बँकेच्या दिल्लीतील करोलबाग येथील एका खात्यात संपूर्ण रक्कम जमा केली जात होती. तक्रारदार यांचे मित्र आणि नातेवाईक ज्या खात्यात पैसे हस्तांतरित करीत होते ते खाते गोठवण्यास बँकेला कळवण्यात आले आहे. याबाबत हैदराबाद आणि पुणे येथे सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.”

“ऑनलाईन माध्यमातून फसवणूक करणारी मोठी नायजेरिन टोळी दिल्लीतील विविध भागात कार्यरत आहे. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या कधीच पुढे येत नाही. कामानिमित्त तिथे आलेल्या किंवा इतर व्यक्तीला किरकोळ मोबदल्याच्या बदल्यात हाताशी धरून ही टोळी काम करते. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे खूप आवश्यक आहे,” असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!