पवईत १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण

पवईत १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण

पवई परिसरातील पालिका प्रभाग क्रमांक १२१मध्ये येणाऱ्या गौतमनगर भागात एक १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात पालिका ‘एस’ विभागातर्फे संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, लोकांना परिसरात येण्या-जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

मुंबईतील कुपर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पवईतील १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाकडून शनिवारी, १८ एप्रिलला रात्री उशिरा देण्यात आली. काही दिवसांपासून रुग्णालयात ही तरुणी उपचार घेत आहे. या बाधित रुग्णामुळे पवई पोलिसांच्या हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या ११ वर पोहचली आहे, तर पवईतील कोरोना बाधितांची संख्या ९ वर पोहचली आहे. यापैकी ६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर ५ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

छायाचित्रे: रमेश कांबळे

काल, १८ एप्रिल २०२० रोजी राज्यात ३२८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून, एकूण संख्या आता ३६४८ अशी झाली आहे. यापैकी ३६५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

“बाधित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु असताना शंका आल्याने तिची तपासणी करण्यात आली होती. ती कोरोना बाधित असल्याचे समोर येताच कोव्हीड रुग्णालयात हलवत तिच्यावर पुढील उपचार सुरु करण्यात आले आहेत, असे याबाबत बोलताना पालिका आरोग्य विभागाने सांगितले.

“आम्ही सकाळीच परिसर सील केला आहे” असे पालिका एस विभागाचे कनिष्ठ अभियंता परिरक्षण विभाग लक्ष्मण जंगले यांनी सांगितले.

“नागरिकांना परिसरातून आतबाहेर करण्यास मनाई करण्यात आल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे याबाबत बोलताना स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे यांनी सांगितले.

पालिका प्रभाग क्रमांक १२१च्या अंतर्गत येणारा हा परिसर खूप मोठी लोकसंख्या असणारी लोकवस्ती आहे. छोट्या छोट्या खोल्यांमध्ये संपूर्ण परिवार एकत्रित राहत आहेत. त्यामुळे सोशल डीस्टंन्सिंग पाळणे नागरिकांना अवघड होऊन बसते. अशावेळी या परिसरात कोरोना प्रसाराचा धोका अधिकच वाढतो असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.

“बाधित तरुणी राहत असलेला परिसर हा खूप दाटीवाटीचा परिसर असल्याने आम्ही पालिकेला येथील काही नागरिकांना अलगीकरण केंद्रात पाठवण्याची विनंती केली आहे,” असे याबाबत बोलताना स्थानिक शाखाप्रमुख मनीष नायर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!