पवईत ९० ग्राम एमडी ड्रगसोबत ३ जणांना अटक

पवई परिसरात एमडी ड्रग्स विक्री – खरेदीसाठी आलेल्या ३ लोकांना बेड्या ठोकत, नशेचा बाजार करणाऱ्या टोळीच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पवई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी सेलने मंगळवार, ५ सप्टेंबरला ही कारवाई केली. अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी ९० ग्राम एमडी ड्रग्स हस्तगत केले आहेत. या ड्रग्सची बाजारात अंदाजे किमत ४.५ लाख रुपये एवढी आहे.

शादाब सलीम मुल्ला उर्फ मस्तान (वय २५ वर्ष) राहणार मरोळ, मोसीन यासिन खान (वय ४२ वर्ष), फहमीदा मोमीन खान, (वय- ३८ वर्ष), दोघेही राहणार गौतम नगर मोरारजी नगर, पवई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. या अनुषंगाने परिमंडळ १० पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनानुसार पवई पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) सुप्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक विजय दळवी यांच्या नेतृत्वात पवई पोलिसांची विविध पथके याच्यावर काम करत होते.

दहशतवाद विरोधी सेलला (एटीसी) मंगळवारी पवईतील गौतम नगर, मोरारजी नगर भागात काही इसम एमडी ड्रग्स खरेदी – विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली होती. “पथकाने या परिसरात साध्या वेशात सापळा रचून नजर ठेवली होती,” असे वपोनि सुप्रिया पाटील यांनी सांगीतले.

“परिसरात पाळत ठेवून असताना २ पुरुष आणि १ महिला परिसरात संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. त्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात ९० ग्राम एमडी ड्रग्स आणि ४५ हजार रोख रक्कम मिळून आले,” असे पवई पोलीस दहशतवाद सेलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक (सपोनि) सूर्यकांत पारटकर यांनी सांगितले.

पोलिसांना ताब्यात घेतलेले आरोपी शादाब याच्या जवळ १५ ग्राम एमडी, मोसीन खान याच्याजवळ ५५ ग्राम एम तर फहमीदा खान हिच्या ताब्यात २० ग्राम एम डी असे ९० ग्राम अंमली पदार्थ मिळून आले आहेत.

यासंदर्भात कलम ८ (क), २२(क), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ नुसार गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली असून, गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि सुप्रिया पाटील, पोनि विजय दळवी, सपोनी सूर्यकांत पारटकर, पोह जगधने, पोना लांडगे, पोशि कासारे, पोशि गायकवाड व मपोशि मदवान यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अटक आरोपी शादाब सलीम मुल्ला उर्फ मस्तान याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १४ पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असून, एमआयडीसी पोलीस ठाण्याने तडीपार केले आहे. “आम्ही आरोपींबाबत इतर पोलीस ठाण्यात आणखी काही गुन्ह्यांची नोंद आहे का? याबाबत माहिती मागवली असून, आणखी किती गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे याचा शोध घेत आहोत. तसेच आरोपींना हे ड्रग्स कोण पुरवठा करते? ते पुढे कोणाला पुरवठा करतात? याबाबत आम्ही तपास करत आहोत” असे वपोनि सुप्रिया पाटील यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!