मुंबईसह पवईची शान मानल्या जाणारया हिरानंदानी गार्डन्स परिसराची सध्या दैना झाली असून, अनेक ठिकाणचे पथदिवे बंद पडले आहेत. काही ठिकाणी तर चक्क अजून पथदिवेच मंजूर नाहीत याच अंधाराचा फायदा घेत धागडधिंगाणा घालणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशी तक्रार नागरिकांमधून येत आहे.
मुंबईत कोरोनाचे आगमन झाले आणि संपूर्ण मुंबई ठप्प झाली. मात्र आर्थिक राजधानी असणारी मुंबापुरी आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी अडकून पडलेली कामे मार्गी लागू लागले आहेत. परंतु या संपूर्ण काळात मुंबईची शान असणाऱ्या परिसरांपैकी एक असणाऱ्या पवईतील हिरानंदानी गार्डन्सची मात्र दुर्दशा झाली असल्याची तक्रार आता येथील नागरिक करू लागले आहेत.
“हिरानंदानीतील असा कोणताच रस्ता किंवा कोणताच चौक आपल्याला पाह्यला मिळणार नाही जेथील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेले आहेत. यामुळे रस्त्यांवर आणि चौकांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. याच अंधाराचा फायदा घेवून तरुण-तरुणी गाड्यांमधून येऊन येथे बसून नशापाणी करणे, धागड धिंगाणा घालणे असा प्रकार करत आहेत.’ असे याबाबत बोलताना येथील स्थानिक रहिवाशी राजन पारकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले कि, “न्यू हिरानंदानी स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर पथदिव्यांची सोयच करण्यात आलेली नाही. याच्या मंजुऱ्यासुद्धा नाहीत. तसेच या शाळेच्या बाजूला असणाऱ्या २ मैदानांमध्ये सुद्धा हीच स्थिती आहे. यामुळे या भागात अशा उपद्रवी लोकांचा अड्डाच झाला आहे. याच रस्त्यावर काही रहिवाशी इमारती सुद्धा आहेत, त्यातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात आम्ही महानगरपालिका, पोलीस आणि हिरानंदानी समूह यांना पत्रव्यवहार आणि तक्रारी सुद्धा केल्या आहेत. मात्र कोणीच हलून दाखवताना दिसत नाही.”
गाडीच्या सायलेंसरमध्ये बदल करून त्याचे चित्रविचित्र आवाज
“हिरानंदानी परिसरासोबतच येथील रस्ते हे चांगल्या दर्जाचे बनवण्यात आलेले आहेत. याचा फायदा घेत जवळच असणाऱ्या पार्कसाईट, संघर्षनगर, आयआयटी रहिवाशी परिसर, खैराणी रोड या परिसरातून काही तरुण मोटारसायकल घेवून येवून ते येथील रस्त्यावरून भरधाव पळवत असतात. गाडीच्या सायलेंसरमध्ये बदल करून त्याचे चित्रविचित्र आवाज काढत संपूर्ण रस्त्यावरून ही उपद्रवी तरुण भटकत असतात. यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. आम्हाला आमच्या घरातून बाहेर पडायला सुद्धा भीती वाटते, कि यातील एखादी भरधाव गाडी येवून धडक मारून ना जावो,” असे याबाबत बोलताना येथील काही स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “पूर्वी परिसरात विकासकाने ठेवलेल्या कमांडोजची दहशत होती. ते त्यांना पकडत होते, पळवत होते. पण सध्या आता ते पण दिसायचे कमी झालेत कारवाई करताना दिसत नाहीत. पोलिसांनी पण डोळेझाक केलेली बघायला मिळत आहे.”
दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
तक्रारीच्या आधारावर अदानी एनर्जीचे अधिकारी चौधरी आणि त्यांचे अजून एक सहकारी यांनी येवून परिसराची पाहणी केली आहे. “पावसामुळे परिसरातील काही पथदिवे बिघडले आहेत, त्यांच्या दुरुस्तीचे काम सध्या अदानी एनर्जीतर्फे परिसरात सुरु आहेत. येत्या ८ – १० दिवसात सगळी दुरुस्तीची कामे पूर्ण होतील. रिचमंड ते न्यू हिरानंदानी स्कूल भागात पथ दिव्याच्या मंजुरीची प्रक्रिया सुरु आहे. तोपर्यंत तात्पुरती सुविधा म्हणून आम्ही ४ हलोजन लाईट बसवलेल्या आहेत. या लाईट डोंगराकडील भाग आणि संपूर्ण रस्ता प्रकाशमान होतील अशा पद्दतीने लावण्यात आलेल्या आहेत. शाळेच्या बाजूकडील मोकळ्या जागेत पथदिवे बसवण्याची कामे लवकरच सुरु होतील याबद्दल पालिका अधिकारी सोनार यांच्यासोबत बोलणे झाले आहे. पावसाने उघडीप देताच काम सुरु होईल,” असे याबाबत बोलताना हिरानंदानी समूहाचे सुदीप्तो लाहिरी यांनी सांगितले.
कोरोनाने सर्वांची दयनीय अवस्था केलेली असताना उच्चभ्रू वस्त्या सुद्धा यातून सुटल्या नसल्याचेच हे उदाहरण आहे. मात्र या परिस्थितीवर योग्य वेळेत लक्ष नाही घातले तर याची दुरावस्था होत गुन्हेगारीचा अड्डा होण्यास वेळ लागणार नाही अशी चिंता सुद्धा आता येथील रहिवाशी व्यक्त करत आहेत.
No comments yet.