पवई तलाव स्वच्छ आणि पुनर्संचयित करण्याच्या प्रकल्पांतर्गत, सांडपाणी लाईन वळवण्याचे आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (एसटीपी) उभारण्याचे काम या महिन्यात जारी होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या स्थितीत, दररोज १.८ कोटी लिटर सांडपाणी सरळ पवई तलावात सोडले जाते. ज्यामुळे तलावात जलपर्णीचे साम्राज्य वाढत आहे, सोबतच यामुळे पाण्याची गुणवत्ता आणि जैवविविधतेवर देखील याचा परिणाम होत आहे.
तलावात सोडला जाणारा सांडपाण्याचा प्रवाह थांबवणे हा तलावाचे जतन करण्याचा एकमेव दीर्घकालीन उपाय असल्याचे पालिकेच्या निदर्शनात आले आहे. सांडपाणी वळवण्यासाठी पुढील आठवड्याभरात कामाचे आदेश जारी केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोबतच ९ एमएलडी क्षमतेचा एसटीपी उभारण्यासाठी १५ दिवसांत कामाचे आदेश जारी केले जाण्याची अपेक्षा असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात येत आहे.
काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होण्यासाठी जवळपास १८ महिने लागतील. या दरम्यान, जलपर्णी साफ करण्याचे काम सुरू राहील.
पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम तांत्रिक अडचणींमुळे थांबले होते; मात्र ते काम पुन्हा सुरू झाले आहे. जलदगतीने आक्रमक वनस्पती काढून टाकणे आणि वाहतूक करण्यासाठी गेल्या महिन्याभरात, पालिकेने पाच मशीन आणि कर्मचारी तैनात केले आहेत.
पवई तलाव वाचवण्यासाठी पुढाकार घेत हरित कार्यकर्त्यानी प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या या निसर्गरम्य तलावाला वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. जर पालिका सांडपाणी वळवण्याच्या दिशेने पुढे जात असेल, तर आशा आहे की काम विलंब न करता सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
No comments yet.