चांदिवली परिसरातील दोघांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याला साकीनाका पोलिसांनी राजस्थानातील जंगलातून अटक केली आहे. चांदिवली येथील एका महिलेची वाईन शॉपच्या नावे ऑनलाईन पेमेंटच्या साहाय्याने तर २२ वर्षीय तरुणाची जून महिन्यात लष्करी अधिकारी असल्याचे सांगून, मोटारसायकल विकण्याच्या बहाण्याने फसवणूक केली होती.
दोन्ही घटनांमध्ये साकीनाका पोलिसांनी मागवलेल्या कॉल डिटेल्सच्या तपासात एक सामान्य दुवा त्यांना मिळून आला होता. दोन्ही केसमधील फसवणूक करणारे राजस्थान येथील खोहरा करमाळी, रामगड (अलवर) येथून कार्यरत होते. अटक टाळण्यासाठी अॅपच्या मदतीने संवाद साधत. त्यांनी अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला होता.
माहितीच्या आधारावर साकीनाका पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पथकाने राजस्थान गाठत तिथे जवळपास ८ दिवस तळ ठोकला. २३ जानेवारीच्या रात्री उन्नास कमरुद्दीन खान (३४) याला तांत्रिक निगराणीच्या आधारावर पथकाने अटक केली. खान याने आपण सैनिकी अधिकारी असून, आपली बदली झाली आहे सांगत वाहन विकण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक केली होती.
दरम्यान अजून एका पथकाने बरकत सहाबुबुद्दीन (२८) याला ताब्यात घेतले. त्याने ऑगस्ट २०२०मध्ये वाईनशॉपच्या नावावर तरुणीची फसवणूक केली होती. एका खून खटल्यात नुकताच त्याला जामीन मिळाला होता.
“अधिकारी आणि पथक स्थानिक असल्याचे भासवत जवळपास एक आठवडा योग्य सोयसुविधा नसणाऱ्या ठिकाणी थांबले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आणि सूत्रांच्या माध्यमातून आरोपीच्या रोजच्या वेळापत्रकाची माहिती गोळा केल्यानंतर खानला जंगलातून पकडले,” साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बळवंत देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले.
परिमंडळ १० पोलीस उपायुक्त महेश रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश नांगरे, वरिष्ठ निरीक्षक बलवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिता भोसले, पोलीस हवालदार संग्राम जगताप, सायबर पथक यांनी ही कारवाई केली.
फसवणूकीसाठी भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडीचा वापर करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सिंडिकेटचा ते भाग आहेत का याचाही पोलिस तपास करत आहेत.
No comments yet.