पवई परिसरात न्यू इयर इव्हच्या (३१ डिसेंबर) रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख बनवून तरुणांना धमकावून लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वेगवेगळ्या तरुणांना यासाठी बळी बनवले आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एका घटनेत तर आरोपीने स्वतःला विद्यार्थी असल्याचे सांगून फसवणूक केली आहे.
पहिल्या घटनेतील फिर्यादी हा २७ वर्षांचा तरुण असून तो मूळचा तेलंगणाचा आहे आणि नोकरीच्या शोधात मुंबईत आला आहे. त्याने डेटिंग ॲपवर आपले प्रोफाइल बनवले होते. ३१ डिसेंबर रोजी पहाटे १२:३० च्या सुमारास त्याची एका व्यक्तीशी याच ॲपवर ओळख झाली. त्या व्यक्तीने आपण पवई येथील एका नामंकित संस्थेचा विद्यार्थी असून वसतिगृहात राहतो असे सांगितले. त्याने तक्रारदारला साकीविहार रोडवरील अमृत बारजवळ भेटायला बोलावले. तिथे पोहोचल्यावर त्याला एका अंधाऱ्या गल्लीतून तरुण घेवून जात असताना २ ते ३ तरुण तिथे आले आणि तुम्ही चोर आहात असे आरोप करून तक्रारदाराला चोर ठरवून पकडले. त्याची अंगझडती घेतली, मात्र काहीच मिळून आले नाही. त्यानंतर त्यांनी धमकी देऊन गुगल पे (Google Pay) उघडायला लावले. खात्यात पैसे नसल्याने त्यांनी मित्रांकडून पैसे मागवण्यास भाग पाडले. अखेर तक्रारदारला भेटायला बोलावलेल्या तरुणाने २०,००० रुपये क्यूआर कोडद्वारे ट्रान्सफर केल्यानंतर पहाटे ४:३० वाजता त्याची सुटका करण्यात आली. तीन लोकांनी संगनमताने आपली फसवणूक आणि लुट केल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार यांनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
दुसऱ्या घटनेत, अंधेरी पूर्व येथील एका मशीन ऑपरेटर तरुणाला अशाच पद्धतीने लुटण्यात आले. ३१ डिसेंबरच्या रात्री ८:३० वाजता त्याच ॲपवर एका व्यक्तीशी त्याची ओळख झाली होती. त्यानंतर ‘ऋषिकेश’ नावाच्या व्यक्तीने त्याला चांदिवली बस स्टॉपजवळ भेटायला बोलावले आणि दुचाकीवरून विहार लेक रोडवरील एका मोकळ्या जागेत नेले. तिथे आधीच असलेल्या तीन तरुणांनी चोरी आणि ड्रग्ज बाळगल्याच्या खोट्या आरोपाखाली धमकावले. एकाने त्याच्या पोटाला बिअरची तुटलेली बाटली लावून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडिताकडून या प्रकरणात देखील जबरदस्तीने २०,००० रुपये उकळण्यात आले.
पवई पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) आणि ३(५) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून अधिक तपास करत आहेत.



No comments yet.