प्रभाग १५७ मधून चुरशीच्या लढतीत डॉ. सरिता म्हस्के विजयी

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निर्णय जाहीर झाले असून, चांदिवलीतील प्रभाग क्रमांक १५७ मध्ये गेली १४ वर्ष सत्ता असणाऱ्या प्रस्थापिताला टक्कर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार सरिता रवींद्र म्हस्के यांनी १४७४९ मते मिळवत १८०३ मताधिक्याने विजयी पताका फडकावली आहे.

या प्रभागात राजकीय वर्चस्व असणारे ईश्वर तायडे यांच्या पत्नी आशा तायडे (भाजपा – शिवसेना (शिंदे) युती) आणि डॉ सरिता म्हस्के (शिवसेना उबाठा, मनसे, राष्ट्रवादी शप) यांच्यात कडवी झुंज होती. आशा तायडे यांना १२९४६ मते तर डॉ सरिता म्हस्के यांना १४७४९ मते मिळाली असून, १८०३ मताधिक्याने डॉ म्हस्के या विजयी झाल्या आहेत. एका  सामान्य कुटुंबातून असलेल्या डॉ. सरिता म्हस्के यांच्या विजयाने येथील नागरिकांच्यात मोठा आनंद आहे.

हा प्रभाग मराठी सह इतर भाषिकांचा प्रभाग आहे. या प्रभागाचा मोठा भाग असणाऱ्या संघर्षनगरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत हजारो कुटुंबाना घरे देण्यात आली आहेत. मात्र आजही या परिसरातील नागरिक नागरी सुविधांसाठी लढत आहेत. नागरिकांच्या या प्रश्नांकडे डॉ सरिता म्हस्के आणि डॉ रवींद्र म्हस्के यांनी लक्ष घालत सत्तेत नसताना देखील अनेक कामे केली होती. विविध पक्षाच्या आमदार, खासदार यांचे फंडातून या प्रभागात कामे केली होती याचाच फायदा त्यांना झाल्याचे म्हटले जात आहे.

कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे या भागात ते अनेक लोकांचे जवळचे मानले जात आहेत. आपल्या वैद्यकीय अनुभवाच्या जोरावर या भागात कोरोना काळात त्यांनी वैद्यकीय सुविधा पुरवत अनेकांना मदतीचा हात दिला होता. कोरोना काळात जवळपास ३ रुग्णालयाने दाखल करण्यास नकार दिलेल्या गर्भवतीची डॉ रवींद्र म्हस्के यांनी घरीच प्रसूती करत महिला आणि बाळाला जीवनदान दिले होते. त्यांच्या या कामामुळेच आपला माणूस म्हणून त्यांची या भागात प्रचीती आहे.

या जोडप्याने अनेकांच्या मनात घर केले होते. याचा फायदा त्यांना या लढतीत झाला आहे भाजपचे प्रस्थापित ईश्वर तायडे यांच्या पत्नी आशा तायडे यांची त्यांना कडवी झुंज होती. मात्र त्यावर मात करत सरिता म्हस्के यांनी येथे विजयी पताका रोवली.

डॉ म्हस्के यांच्या विजयानंतर आनंद साजरा करताना कार्यकर्ते व जनता

काम करण्याची इच्छा

इमारत भागात राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न हे चाळसदृश्य भागातील नागरिकांपेक्षा वेगळे असतात. त्यांच्या या प्रश्नांना समजून घेवून हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनने जाहीर केलेल्या चांदिवलीच्या मेनिफेस्टोचे त्यांनी स्वागत करत आपल्या प्रभागातील यातील प्रत्येक मुद्याला त्यांनी सोडवण्याचे वचन नागरिकांना दिले आहे.

आपल्या विजयावर प्रतिक्रिया देताना, डॉ. म्हस्के यांनी पुढील कामावर लक्ष केंद्रित केले. “मी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरले होते, आणि जनतेने मला भरभरून पाठिंबा दिला आहे,” असे त्यांनी सांगितले. “त्यामुळे, मी आत्ताच काम सुरू करण्यास सज्ज आहे.”

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!