चांदिवलीमध्ये प्रभाग १५७ मध्ये सरिता म्हस्के यांच्या रुपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठी सत्ता पालट केली असतानाच चांदिवलीत वर्चस्व असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चित्रा सोमनाथ सांगळे यांनी ४,९०१ मताधिक्याने विजय मिळवत आपला गड कायम ठेवला आहे. पाठीमागील २५ वर्षापासून सांगळे परिवार या प्रभागात विकासाचे कार्य करत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-महाराष्ट्र नवनिर्माण सेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार), शिवशक्तीच्या प्रभाग क्रमांक १५८ च्या उमेदवार चित्रा सोमनाथ सांगळे यांना १३,२८६ मते मिळाली, तर भाजप – शिवसेना महायुतीच्या आकांक्षा शेट्ये यांना ८,३८५ मते मिळाली आहेत. चित्रा सांगळे ४,९०१ मतांनी विजयी झाल्या आहेत.
सांगळे या यापूर्वीही नगरसेवक राहिल्या असून, यापूर्वी प्रभाग क्रमांक १५७ मधून नगरसेवक राहिलेल्या आकांक्षा शेट्ये यांच्याशी त्यांचा सामना होता. शेट्ये या चांदिवली परिसरात वर्चस्व असणारे ईश्वर तायडे यांच्या परिवारातील असल्याने त्यांचा मोठा पाठींबा होता. तर चित्रा सांगळे यांचा राजकीय अनुभव सोबत होताच, सोबतच पती आणि शिवसेना उबाठाचे विभाग क्रमांक ६चे विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांचा मोठा पाठींबा त्यांच्या सोबत होता.
प्रचार काळात शाखा भेटी दरम्यान खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगळे आणि म्हस्के यांच्या प्रभागात भेटी देवून उमेदवार आणि मतदार यांना मार्गदर्शन केले होते.
सांगळे यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या प्रभागात अनेक कामे केली आहेत. सोबतच सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात ते अग्रेसर राहिले आहेत. चांदिवलीला वाहतूक कोंडीतून सुटका करून देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ९० फुट रोडचे त्यांच्या प्रभागातील चांदिवली येथील रस्त्याचे काम देखील त्यांनी केले आहे. यामुळे जनतेचा त्यांना मोठा पाठींबा असून, आजच्या त्यांच्या विजयात हा पूर्णपणे दिसून येत आहे.



No comments yet.