आमदार लांडेंकडून पावसाळापूर्व कामांची पाहणी; ओपन जिमचे उद्घाटन

मुंबईत पाठीमागील काही दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसत मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिलेले आहेत. अशावेळी आपल्या विभागातील पावसाळापूर्व नाले, बंदिस्त गटारे, मलनि:स्सारण वाहिन्या यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित रित्या झालेली आहेत का? याचा शुक्रवार, १७ जून रोजी स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी पाहणी करून आढावा घेतला. तसेच हिरानंदानी येथील उद्यानात बनवण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले.

यावेळी आमदार लांडे यांच्यासह, पालिका एस विभाग सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी, उद्यान, पर्जन्यजल, रस्ते आणि मेंटेनन्स विभागाचे अधिकारी, शाखाप्रमुख सचिन मदने, हिरानंदानी रहिवाशी संघटनेचे संजय तिवारी, शिवा सूर्यवंशी, राजेश जाधव, महिला शाखा संघटिका सुषमा आंब्रे, वैशाली सूर्यवंशी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

या वर्षी मान्सुनचे आगमन दरवर्षीपेक्षा लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून, मुंबई महानगरपालिकेने पावसाळापूर्व सर्व कामे उत्तम पद्धतीने केल्याचा दावा करत त्याचा सामना करण्यास पालिकेची यंत्रणा सुसज्ज असल्याचेही म्हटले आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्या आधीच ७ मार्च रोजी १४ व्या मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आली. त्यामुळे सर्वपक्षीय २२७ नगरसेवक व ५ नामनिर्देशित नगरसेवक यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. पालिका आयुक्त यांच्या खांद्यावर पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची प्रशासक म्हणून जबाबदारी आहे. अशात चांदिवली विभागाचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी पुढाकार घेत आपल्या विभागात योग्य पद्दतीने साफसफाई आणि रस्त्यांचे काम झाले आहे का? याची शुक्रवारी पाहणी केली.

तसेच यावेळी त्यांनी इतर कामांसह कमकुवत झाल्याने पावसाळ्यात झाडांच्या फांद्या किंवा झाडे पडण्याच्या घटना रोखण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांसोबत परिसरातील झाडांची पाहणी करत योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश पालिका अधिकारयांना दिले.

“पावसाळ्यात मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठून राहण्याचे प्रकार घडत असतात. यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या विभागात असा प्रकार घडू नये त्या अनुषंगाने परिसरात सुरू असलेल्या कामांची आणि झालेल्या कामांची प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी करण्यात येत असून, संबंधित कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांना योग्य सूचना देण्यात येत आहेत,” असे यावेळी बोलताना लांडे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “नाला आकाराने लहान असो वा मोठा, त्याच्या प्रवाहात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊन पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घेऊन नाले सफाईची कामे करावीत, असे निर्देश संबंधिताना देण्यात आले आहेत.”

ओपन जिमचे उद्घाटन

हिरानंदानी येथील पंडित दिन दयाल उपाध्याय उद्यानात असणाऱ्या ओपन जिमच्या साहित्यांची मोडतोड झाल्याने नागरिकांना त्याचा उपयोग करता येत नव्हता. आमदार लांडे यांच्या प्रयत्नातून नवीन साहित्य बसवण्यात आले असून, आमदार लांडे आणि उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शुक्रवार, १७ जून रोजी या ओपन जिमचे उद्घाटन पार पडले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!