हातगाडी लावण्याच्या वादातून गोखलेनगर येथे एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार (१९ फेब्रुवारी) १२.३० वाजता पवईत घडला. चाकूने छातीत भोकसून अमोल सुराडकर (२५) या तरुणाचा खून करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी शिताफीने सचिन सिंग आणि जितेंद्र उर्फ प्राण या दोघांना पळून जाण्याच्या तयारीत असताना कुर्ला येथून अटक केली आहे.
या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अमोल हा आपला एक मित्र खरात याच्यासह साधना हॉटेलजवळ गोखलेनगर येथे बोलत बसले होते. याचवेळी आरोपी तरुण जितेंद्र तिथे आला आणि अमोल सोबत हातगाडी लावण्यावरून वाद घालू लागला.
“जितेंद्रने आपला साथीदार सचिन सिंग यास बोलावून घेतले. त्या दोघांनी मिळून हातगाडी लावण्याच्या कारणावरून अमोल याच्याशी वाद घालत शिवीगाळ करू लागले. याच रागात जितेंद्र मारहाण करत असताना सचिनने चाकूने अमोल याच्या छातीत भोकसून जीवे ठार मारले,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
जखमी अमोल यास प्रथम पवई हॉस्पिटल येथे नेण्यात आले, मात्र तिथे सुविधा नसल्याने “त्याला हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले,” असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सांगितले.
“घटनेनंतर दोन्ही आरोपी पळण्याच्या तयारीत असताना जितेंद्रला पवईमधून तर सचिन यास कुर्ला टर्मिनस या ठिकाणाहून आमच्या पथकाने ताब्यात घेतले आहे, असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.
या संदर्भात भादवि कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा नोंद करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.