पवई येथील मेडिकल आणि जनरल स्टोअरच्या मालकाची ₹ २०,०००ची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी आपली ओळख सैन्य अधिकारी म्हणून करून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना काळात नागरिकांना आवश्यकता असणाऱ्या मेडिकल किटची गरज लक्षात घेता, आरोपीने हँड सॅनिटायझर, मास्क आणि हँड ग्लोव्हज ऑर्डर करून त्याचे पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड पाठवत मेडिकल मालकाची ऑनलाईन फसवणूक केली आहे.
या संदर्भात २९ वर्षीय मेडिकल मालक यांनी पवई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पवई परिसरात त्यांचे एक मेडिकल आणि जनरल स्टोअरचे शॉप आहे. ३० जूनला माझ्या वडिलांना एका इसमाने फोन करून आपल्या अधिकाऱ्यांना हँड सॅनिटायझर, मास्क आणि हँड ग्लोव्हजचे वाटप करायचे आहे असे सांगत ८३ हजार रुपयांची ऑर्डर दिली. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात तक्रारदार यांनी म्हटले आहे.
“ऑर्डरची रक्कम ऑनलाईन पेमेंट करून देत असल्याचे सांगत आरोपीने त्यांना एक क्यूआर कोड पाठवला. हा कोड स्कॅन करा आपल्या खात्यात पैसे जमा होतील असे त्याने सांगितले. क्यूआर कोड स्कॅन करताच तक्रारदार यांच्या खात्यातून २० हजार रुपये निघून गेले होते,” असे पोलिसांनी सांगितले.
हे वाचले का? – प्रेम आणि आठवणीत चिंब करायला ‘बरसात आली’
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
“कोरोनाच्या काळात नागरिक ऑनलाईन पेमेंट पध्दतीचा वापर जास्त करत असल्याने, सायबर चोरट्यांनी याचा अधिक फायदा घेतला आहे. विविध प्रलोभनाच्या नावाखाली ते नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटनेत या काळात वाढ झाली आहे. कोरोना काळात हँड सॅनिटायझर, मास्क आणि हँड ग्लोव्हजची आवश्यकता भासत असल्याने याचा पुरवठा आणि मागणी अशा दोन्हीच्या नावाखाली ते आपला डाव साधत आहेत. जास्तीत जास्त प्रमाणात ते ज्येष्ठ नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे समोर येत आहे.” असे याबाबत बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
“नागरिकांनी खात्रीशीर आणि ओळखीच्या व्यक्तींच्या सोबतच ऑनलाईन व्यवहार करणे सुरक्षित आहे. ऑनलाईन माध्यमातून येणाऱ्या लिंक आणि कोड यावर क्लिक करू नये,” असेही त्यांनी सांगितले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.