पूल धोकादायक असल्याने आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून, प्रवाशांनी जेवीएलआर मार्गे प्रवास करण्याचे आवाहन पालिका आणि वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
पवईतील आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर असणारा मिठी नदीवरील पुलाचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी घडली. विशेष म्हणजे २ वर्षापूर्वी हा पूल धोकादायक घोषित करण्यात आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत घेत नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. या घटनेनंतर पुढील कोणताही निर्णय होईपर्यंत आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर वाहनांना बंदी करण्यात आली आहे. सध्या केवळ दुचाकी वाहनांना येथून सोडण्यात येत असून, प्रवाशांनी जेवीएलआर मार्गे प्रवास करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
विहार तलाव आणि आसपासच्या परिसराच्या निर्मितीच्या काळात विहार तलाव येथून उगम पावणाऱ्या मिठी नदीवर इंग्रजांच्या काळात या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. दगडी बांधकाम असणारा हा पूल किनाऱ्याजवळील भागात अजूनही मजबूत आहे. मात्र या शॉर्टकट मार्गावरून अनेक अवजड वाहने जात असल्याने पुलाची अवस्था पाठीमागील काही वर्षात खूपच दयनीय झाली होती. दुरावस्थेबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकेला केलेल्या तक्रारीनंतर २०१९ साली हा पूल धोकादायक ठरवत येथून अवजड वाहनांना आणि बसेसना जाण्यास बंदी घालण्यात आली.
“खासदार गजानन किर्तीकर यांनी पालिकेच्या एस विभाग हद्दीत असणाऱ्या समस्यांबाबत घेतलेल्या बैठकीत येथील मिठी नदीवरील पूल बांधण्यास होत असलेल्या विलंबाबाबत मुद्दा मांडला होता. यावेळी १ ऑक्टोबर २०१९ रोजी या पुलाचे बांधकाम सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पालिकेने सांगितले होते. तसेच सदर कामी कंत्राटदाराकडून अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव देण्यात आला असून, सदर बाबत कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले होते,” असे याबाबत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस वॉर्ड क्रमांक १२१चे अध्यक्ष सतिश बनसोडे यांनी सांगितले.
“ते पुढे म्हणाले कि, “कंत्राटदाराकडून वेळकाढूपण सुरु असून, वेळेत काम सुरु न केल्याने यासाठी दुसऱ्या कंत्राटदाराकडून काम चालू करण्याची तयारी कार्यकारी अभियंता (पूल) यांनी करावी असे आदेश देण्यात आले असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात येत आहे.”
कोणतीही वर्कऑर्डर नसताना या भागात मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरु असताना सुरक्षा भिंतीचा भाग तोडला गेल्याने जमीन धसून पुलाचा काही भाग पडला असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
“पूल खूपच धोकादायक अवस्थेत असून, अवजड वाहनांना बंदी असूनही अवजड वाहने या भागातून जात असल्याने पूल अजूनच धोकादायक झाला आहे. त्यातच याच्या आसपास सुरु असणाऱ्या कामांमुळे धोका अजूनच वाढला आहे.” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिक अर्जुन खाडे आणि कैलाश अजेटराव यांनी सांगितले.
या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठी लोकवस्ती आहे. दोन्ही भागातील लोकांसाठी हा पूल एक मोठा दुवा आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे किंवा सुरु असणाऱ्या इतर कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे हा पूल पडला तर दोन्ही परिसराचा संपर्क पूर्णपणे तुटून जवळपास ८ ते १० किलोमीटरचा लांबचा पल्ला पार करून नागरिकांना आपल्या परिसरात पोहचावे लागेल. जे सामान्य नागरिकांसाठी खूपच त्रासदायक आहे, असे याबाबत बोलताना स्थानिकांनी सांगितले.
या संदर्भात स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे यांनी बोलताना सांगितले कि, “मलनिस्सारन वाहिनी टाकण्याचे काम त्या भागात सुरु आहे. ही वाहिनी टाकताना निर्माण झालेल्या हादरयामुळे घटना घडली. पुलाच्या कामासाठी आम्ही पाठपुरावा करतोय, मात्र काम कोविडमुळे थांबले आहे. येणाऱ्या काही दिवसात त्याचे टेंडर निघून वर्कऑर्डर निघून काम सुरु होईल.”
“या परिसरातून पूर्वी विविध भागात जाणारया ८ ते १० बसेस होत्या, मात्र धोकादायक पुलामुळे बस बंद झाल्याने पाठीमागील १८ ते १९ महिन्यांपासून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता आम्हाला फिल्टरपाडा भागातून एक बस आहे. जी प्रत्येक तासानंतर आहे किंवा पवई गार्डन पर्यंत चालत जावून मग तिथून बस पकडावी लागते आहे. पालिका या पुलाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष आणि चालढकल करत असल्याने अजून किती काळ आम्हाला या समस्येचा सामना करावा लागणार कोण जाणे,” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना जितू सिंग यांनी सांगितले.
“आमच्याकडे संपूर्ण परवानग्या आहेत. सर्व परवानगीने आमचे काम सुरु आहे, पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करून काही सूचना आम्हाला दिल्या आहेत,” असे याबाबत बोलताना मलनिस्सारन वाहिनी टाकण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे प्रतिनिधी संजय पाल यांनी सांगितले.
घटनेनंतर पालिकेने पाहणी करून तुटलेल्या भागाची डागडुजी केली आहे. वाहतूक विभागाकडून मोरारजीनगर भागात बेरीकेट लावून ट्राफिक वॉर्डनना तैनात करण्यात आले असून, दुचाकी वगळता इतर वाहनांना इथून आरे कॉलोनीकडे जाण्यास प्रवेश नाकारला जात आहे.
या संदर्भात पालिकेशी संपर्क साधला असता, “आम्ही जागेची पाहणी करून डागडुजीचे काम केले आहे. तसेच काम सुरु असणाऱ्या कंत्राटदाराला इतर भागात सुद्धा आतून पडझड झाली आहे का हे पाहण्याचे आदेश दिलेले आहेत,” असे सांगण्यात आले.
No comments yet.