संडासचा डब्बा वापरण्यावरून सुरु झालेल्या वादातून शाब्दिक शिवीगाळ केल्यानंतर मयतावर धारदार शस्त्राने हल्ला करत खून करून आरोपी पसार झाले होते.
शाब्दिक भांडणानंतर २१ वर्षीय तरुणाची पवई येथे हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यासंदर्भात सोशल मिडीयाच्या मदतीने पवई पोलिसांनी पसार झालेल्या अजय गुप्ता आणि अनिल गुप्ता यांना विशाल मोहितराम राव याच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील तुंगागाव येथे राहणाऱ्या विशाल राव आणि अजय गुप्ता यांच्यात महिनाभरापूर्वी संडासचा डब्बा मागण्यावरून वाद झाले होते. याच वादातून त्यांच्यात सतत शाब्दिक खटके उडत होते.
शुक्रवारी रात्री विशाल हा आपल्या दोन मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर पडला होता. साकीविहार रोडवरून फिरत असताना आरोपी आणि विशाल यांच्यात पुन्हा शाब्दिक भांडणे सुरु झाली. आईवरून शिवीगाळ होत हा वाद विकोपाला गेला.
“आधीचा राग आणि आईवरून झालेला शिवीगाळाचा राग मनात धरून विशाल आपल्या मित्रांसोबत साकीविहार रोडवर फिरत असताना आरोपींनी त्याला रस्त्याच्या दुसऱ्या भागात आपल्याकडे बोलावून घेतले. त्याला शिवीगाळ केल्याबद्दल विचारणा करत धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करून २१ वार करत गंभीर जखमी करून तेथून पळ काढला, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष सावंत म्हणाले.
परिमंडळ दहाचे पोलिस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, आरोपींनी विशालच्या मानेवर, खांद्यावर आणि पोटावर २१ वार केले त्याला गंभीर जखमी करून ते पळून गेले होते. त्याच्या मित्रांनी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.”
विशालसोबत असलेल्या मित्रांनी पोलिसांना आरोपींचे वर्णन दिले होते. ज्याच्या आधारे पोलिस पथकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोघांचा शोध घेतला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट्सवरील संकेतांचा वापर करून, पोलिसांनी गुन्ह्याच्या दोन तासांच्या आत दोघांना ताब्यात घेतले.
“आजूबाजूला कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते त्यामुळे आरोपींची ओळख करणे कठीण होते. आमच्याकडे फक्त हल्लेखोरांचे वर्णन होते. त्याच्या आधारावर आम्ही सोशल मिडीयावर माहिती मिळवत त्याच्या एका मित्राच्या मदतीने गुप्ता भावांचा सहभाग समोर आला होता. त्याच आधारावर दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली,” असे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद लाड यांनी आवर्तन पवईला सांगितले.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार अजून हस्तगत करण्यात आलेले नाही. भादवि कलम ३०२ (खून), ३४ (सामयिक उद्देश) अंतर्गत दाखल गुन्ह्यात दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक बुधन सावंत आणि पोलीस निरिक्षक संतोष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड, पो.ह. दामू मोहोळ, पो.ना. वैभव पाचपांडे, पो.ना. प्रवीण सावंत, पो.शि. भरत देशमुख, पो.शि. सुर्यकांत शेट्टी, पो.शि. भास्कर भोये, पो.शि प्रशांत धुरी आणि महिला पोलीस शिपाई शितल लाड यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.
No comments yet.