मूड इंडिगोच्या ढिसाळ नियोजनाविरोधात शिवसेना – मनसे आक्रमक; नागरिकांना नाहक त्रास झाल्यास आंदोलनाचा इशारा

आयआयटी मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या ‘मूड इंडिगो’ फेस्टमध्ये हजारोंच्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने मंगळवारी, १६ डिसेंबरला पवईसह जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडजवळ असणाऱ्या अनेक परिसरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. तासंतास मुंबईकर या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने मुंबईकरांना ऐन घरी परतीच्या काळात नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते. याबाबत संताप व्यक्त करत शिवसेना आमदार सुनील राउत यांच्या नेतृत्वात शिवसेना शाखा १२२ आणि मनसे पदाधिकाऱ्यानी सरळ आयआयटी प्रशासनाला जाब विचारला.

फेस्टिवलच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याचे ढिसाळ नियोजन केल्यामुळे परिसरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा उद्भवू नये यासाठी व्यवस्थित नियोजन करण्याचे निवेदन शिवसेनेतर्फे आयआयटी मुंबईचे संचालक डॉ शिरीष केदारे यांना देण्यात आले. यावेळी यापुढे अशा कार्यक्रमांचे नियोजन करताना योग्य नियोजन करून कॅम्पस बाहेरील भागात लोकांना याचा त्रास होणार नाही आणि वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे उपविभागप्रमुख निलेश साळुंखे, विधानसभा संघटक धर्मनाथ पंत, उपविधानसभा संघटक सुषमा आंब्रे, शाखाप्रमुख सचिन मदने, मनसे उपविभाग अध्यक्ष शैलेश वानखेडे, उपशाखा अध्यक्ष  राहुल कदम, श्रावण गायकवाड, महेश देढे, नितीन भावसार, वनिता पाटकर यांच्यासह शिवसेना – मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन दिवस प्रवेश बंदी

आयआयटी मुंबईच्या ‘मूड इंडिगो’ महोत्सवात झालेल्या प्रचंड गर्दीनंतर, संस्थेने बुधवारी घोषणा केली की, त्यांनी वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाशी संबंधित बुधवार आणि गुरुवारच्या सर्व कार्यक्रमांसाठीची पूर्व-नोंदणी रद्द केली आहे.

शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये संस्थेने म्हटले आहे की, दोन दिवसांसाठी बाहेरील लोकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. या काळात केवळ स्पर्धेत सहभागी होणारे आणि आयआयटी मुंबईचे रहिवासी असलेल्यांनाच कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जाईल.

या निर्णयामागील कारण आयआयटी मुंबईने अधिकृतपणे सांगितले नसले तरी मंगळवारी संध्याकाळी पवई परिसरात, विशेषतः जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (जेव्हीएलआर) विद्यार्थ्यांच्या झालेल्या मोठ्या गर्दीमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.

गर्दीचे नियोजन झाल्याने वाहतूक कोंडी

‘मूड इंडिगो’ हा सर्वात मोठ्या महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवांपैकी एक आहे. यामुळे आयआयटी मुंबईमध्ये शेकडो अभ्यागत येतात. १६ डिसेंबर, मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून (जेव्हीएलआर) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पवईजवळ तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, अनेकांनी अनेक तासांच्या विलंबाची तक्रार केली. वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थी आणि अभ्यागतांच्या गर्दीमुळे पवई आणि आसपासच्या परिसरात मोठी कोंडी झाली होती. अधिकाऱ्यांच्या मते, वाहतूक कोंडी संध्याकाळी सुरू झाली आणि रात्री उशिरापर्यंत ती कमी होईपर्यंत अनेक तास सुरू होती.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!