आगामी निवडणुकांच्या तोंडावर मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पवई परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि तीन वेळा नगरसेवक राहिलेले चंदन चित्तरंजन शर्मा यांनी आज, १८ डिसेंबर रोजी कमळ हाती घेतले. दादर येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी शर्मा यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
पवईच्या विकासाचा वारसा आता भाजपसोबत
चंदन शर्मा यांचा भाजपप्रवेश हा केवळ एक राजकीय बदल नसून पवईच्या राजकारणातील एका मोठ्या शक्तीचे स्थलांतर मानले जात आहे. चंदन शर्मा यांच्यासह त्यांच्या पत्नी चारू शर्मा यांनीही या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. शर्मा परिवाराचा पवईच्या जडणघडणीत ऐतिहासिक वाटा राहिला आहे.
चित्तरंजन शर्मा यांचे योगदान – चंदन शर्मा यांचे वडील चित्तरंजन शर्मा यांनी १९८५ मध्ये नगरसेवक म्हणून पवईचा कायापालट केला. गोरगरिबांना हक्काची घरे मिळवून देणे आणि शिक्षण प्रसारासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
ऐतिहासिक त्याग – चंदन शर्मा यांचे आजोबा आणि स्वातंत्र्यसैनिक चंद्रभान शर्मा यांनी देशाच्या उच्च शिक्षणासाठी (IIT Bombay च्या उभारणीसाठी) आपली जमीन दान केली होती. त्यांच्या या दातृत्वाची दखल खुद्द तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घेतली होती.
पवईच्या हितासाठीच हा निर्णय
यावेळी बोलताना चंदन शर्मा भावूक झाले होते. ते म्हणाले, “माझ्या परिवाराने पवईच्या विकासासाठी आयुष्य वेचले आहे. हाच वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन आणि पवईच्या विकासाचा रथ थांबणार नाही, याची ग्वाही देतो.”
शर्मा यांच्या भाजप प्रवेशामुळे पवई आणि लगतच्या परिसरात भाजपची ताकद प्रचंड वाढली असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.



No comments yet.