गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह पवईत सराईत गुन्हेगाराला अटक

गंभीर गुन्हा करण्याच्या इराद्याने देशी पिस्तुल घेवून पवई परिसरात फिरत असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पवई पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे पोलिसांना एक बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड, पोलीस हवालदार मारुती सुरनार, पोलीस शिपाई वारंग, शिरसाट आणि पोलीस हवालदार चव्हाण हे पोलीस ठाण्यात दैनंदिन काम करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती बेकायदेशीर अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली.

या माहितीची खातरजमा करण्यासाठी उपनिरीक्षक आव्हाड यांनी वरिष्ठांना घटनेची कल्पना दिली. “पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक पवई परिसरात गस्त घालण्यासाठी रवाना झाले. गस्तीदरम्यान पहाटे ३:०० वाजेच्या सुमारास साकीविहार रोडवरील सोलारिस कंपनीजवळ एक संशयित इसम पथकाला घुटमळताना आणि संशयास्पद हालचाली करताना आढळून आला,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

पथकाने तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव मन्सूर रियाज शेख उर्फ मन्सूर चिकना (३१) असे सांगितले. तो पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. “पोलीस शिपाई वारंग आणि हवालदार सुरनार यांनी पंचांसमक्ष मन्सूरची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेजवळ पोलिसांना गावठी बनावटीचे पिस्तूल (अंदाजे किमत ५०,००० रुपये) मिळून आले. तसेच त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात दोन जिवंत काडतुसे (अंदाजे किंमत ४००० रुपये) सापडली,” असे पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हत्याराचा कोणताही परवाना आरोपीकडे नसून, हे पिस्तूल मिलिंद नगर येथील कचरा कुंडीजवळ त्याला सापडल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले.

याप्रकरणी बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी आरोपी मन्सूर शेख विरुद्ध पवई पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम, १९५९ कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७(१)(अ), १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!