खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा नडला

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असतानाच साकीनाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साकीनाका येथील खैरानी रोडवर रस्त्यावरील २० ते २५ फुट  खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने एका ६० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अस्लम इसाक शेख (रा. यादव नगर, साकीनाका) असे या मृत पावलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे मुंबई महानगरपालिका (BMC) आणि खाजगी कंत्राटदारांच्या सुरक्षेच्या दाव्यांचे वाभाडे निघाले असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

सुरक्षेविना सुरू होते मॅनहोलचे काम

मिळालेल्या माहितीनुसार, खैरानी रोडवरील सन्मान हॉटेल आणि एस. जे. स्टुडिओजवळ पाण्याच्या ड्रेनेज ग्रिलच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. एका खाजगी कंत्राटदाराच्या कामगारांनी दुरुस्तीसाठी मॅनहोलचे मुख्य झाकण काढून ठेवले होते. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, या २० ते २५ फूट खोल असलेल्या मॅनहोलला केवळ एका बाजूला अर्धवट जाळी होती, तर दुसरी बाजू पूर्णपणे उघडी होती.

बुधवारी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास मुसळधार पाऊस पडत असताना, अस्लम शेख हे फोनवर बोलत या रस्त्यावरून जात होते. रस्त्यावर साचलेले पाणी आणि मुसळधार पावासामुळे त्यांना मॅनहोलच्या उघड्या भागाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते थेट मॅनहोलमध्ये कोसळले आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाहून गेले.

अग्निशमन दलाकडून मृतदेह बाहेर

अस्लम शेख मॅनहोलमध्ये पडल्याचे तिथे उभ्या लोकांना लक्षात येताच तातडीने मुंबई महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलीस, अग्निशमन दल आणि पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने शेख हे पडलेल्या जागेपासून १५ ते २० फूट अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलच्या दिशेने वाहून गेले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ शोधमोहीम सुरू करून दुपारी दोनच्या सुमारास त्यांना बाहेर काढले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

या दुर्घटनेनंतर कंत्राटदाराच्या निष्काळजीपणा विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रत्यक्षदर्शिनी याबाबत बोलताना सांगितले की, “पालिका, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार यांना लोकांच्या जीवाशी काहीही देणेघेणे नाही. घटनेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी साधे बॅरिकेड्स किंवा धोक्याचा इशारा देणारे फलकही लावले नव्हते. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.”

या प्रकरणी बोलताना मुंबईचे उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारावर महानगरपालिका कठोर कारवाई करेल. सध्या साकीनाका पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा तपास सुरू केला आहे. मान्सून काळात पालिकेच्या कामांमधील अशा हलगर्जीपणामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन

महापौर रितू तावडे यांनी घटनेची पाहणी केल्यानंतर बोलताना सांगितले कि, “पोलिसांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत. आम्ही यासाठी जबाबदार पालिका अधिकारी – सहाय्यक आयुक्त (एल विभाग) धनाजी हिर्लेकर, दुय्यम अभियंता (परिरक्षण – एल विभाग) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (एल विभाग) अभिजित चौगुले, सहाय्यक अभियंता उत्तम पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला पालिकेतर्फे १० लाखाची मदत देण्यात येणार आहे.”

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!