पवई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने फिल्टरपाडा परिसरात गस्तीदरम्यान धडक कारवाई करत एका ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ८४ ग्रॅम वजनाचा ‘एमडी’ (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे ४ लाख २० हजार रुपये आहे. याशिवाय आरोपीच्या घरातून १ लाख ६२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. अरबाझ समीर खान उर्फ उबेद (वय ३०, रा. फिल्टरपाडा, पवई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पवई पोलीस ठाण्याचे पथक एका जुन्या गुन्ह्यातील पाहिजे असलेली महिला आरोपी शबाना रहमान शेख हिचा शोध घेण्यासाठी फिल्टरपाडा परिसरात गेले होते. त्याचवेळी त्या परिसरात उभा असलेला अरबाझ खान पोलिसांना पाहून घाबरला. त्याने स्वतःच्या हातातील एक काळी प्लास्टिकची पिशवी गडबडीने लपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या संशयास्पद हालचाली पाहून सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) ढेकळे आणि पथकाने त्याला तत्काळ ताब्यात घेतले.
“पंचांसमक्ष त्याची झडती घेतले असता, त्याच्या हातातील काळ्या पिशवीत पांढऱ्या व पिवळसर रंगाची ‘एमडी’ (मेफेड्रॉन) पावडर आढळून आली,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
यासोबतच ड्रग्ज ग्राहकांना छोट्या पुड्या करून विकण्यासाठी लागणाऱ्या ५० रिकाम्या प्लास्टिक पिशव्या आणि २ छोटे स्टीलचे चमचे पोलिसांना पिशवीत मिळून आले. “आरोपीने चौकशीदरम्यान कबुली दिली की, तो या पावडरच्या लहान पुड्या बनवून नशेखोरांना विकायचा.” असे पवई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
घरझडतीत दीड लाखांची रोकड जप्त
अंमली पदार्थ जप्त केल्यानंतर पोलिसांनी अरबाझ याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना ड्रग्ज विक्रीतून कमावलेली एकूण १,६२,५०० रुपयांची रोख रक्कम सापडली.
एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पवई पोलिसांनी जप्त केलेले ड्रग्ज, रोकड आणि वजन करण्याचे साहित्य सीलबंद केले आहे. आरोपी अरबाझ खान याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) अंतर्गत कलम ८ (क) आणि २२ (क) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तो हा साठा कोणाकडून आणायचा आणि मुंबईत त्याचे आणखी कोणाशी लागेबांधे आहेत, याचा अधिक तपास पवई पोलीस करत आहेत.
पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बंडगर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक ढेकळे, पोलीस उपनिरीक्षक पवार, पो.ह. सुरनर, पो.ह. चव्हाण, पो.शि वारंग, पो.शि शिरसाट, म.पो.शि. कोलापटे यांनी केली.



No comments yet.