ऐन पावसाळ्यात पवई आणि चांदिवलीत भीषण पाणी टंचाई; रहिवासी पाण्यासाठी हवालदिल

पावसाळ्याचे दिवस असूनही मुंबईतील पवई आणि चांदिवली या दोन शेजारील परिसरात सध्या पाण्याची प्रचंड चणचण जाणवत आहे. एका बाजूला झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गरीब नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, तर दुसऱ्या बाजूला बहुमजली सोसायट्यांमधील रहिवाशांना खाजगी टँकरसाठी दररोज हजारो रुपयांचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या दोन्ही भागांतील पाणीबाणीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे.

चांदिवलीत सोसायट्यांना टँकरचा फटका; हजारो रुपयांचा भुर्दंड

चांदिवलीतील नहार अमृत शक्तीसह चांदिवली परिसरातील ३० ते ४० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये गेल्या आठवडाभरापासून पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा खंडित झाल्याने किंवा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने शेकडो कुटुंबे खाजगी टँकरवर अवलंबून आहेत. यामुळे सोसायट्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. येथील ‘सिंक्रोनिसिटी सोसायटी’ला दररोज खाजगी टँकरसाठी तब्बल १२,००० रुपये मोजावे लागत असून, गेल्या चार दिवसांतच त्यांचा खर्च ५०,००० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मनदीप सिंग मक्कर यांनी महापालिकेच्या ‘एल’ विभागाकडे तातडीने तक्रार दाखल करत मुख्य जलवाहिनीतील दोष, ब्लॉकेज किंवा प्रेशरमधील तांत्रिक बिघाड शोधण्याची मागणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेचा हेल्पलाईन क्रमांक १९६१ बंद असल्यामुळे आणि ऑनलाईन पोर्टलवर तक्रारी नोंदवण्यास अडचणी येत असल्याने रहिवाशांनी सोशल मीडियावर प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पवईत तीव्र पाणीटंचाई; संतप्त महिलांनी रोखली अधिकाऱ्यांची गाडी

पाहणीसाठी आलेल्या महापालिकेच्या जलविभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाला संतप्त महिलांनी घेराव घातला  – photo: Ramesh Kamble

 

दुसरीकडे पवई परिसरात चाळसदृश्य वस्ती असलेल्या चैतन्यनगर, गरीब नगर आणि इंदिरा नगर या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. येथील रहिवाशांना दोन-दोन दिवस पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे.

यामुळे या परिसरातील महिला संतप्त झाल्या असून, या समस्येचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी महापालिकेच्या जलविभागाचे अधिकारी जेव्हा पाहणीसाठी आले, तेव्हा संतप्त महिलांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातला. ‘केवळ पाहणी नको, तर कायमस्वरूपी तोडगा काढा’ अशी आक्रमक मागणी महिलांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली.

स्थानिक रहिवाशांनी याबाबत बोलताना म्हटले की, ‘पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने आमचा दिनक्रम पूर्णपणे बिघडला आहे. गेल्या महिनाभरापासून पालिका कार्यालय आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही तोडगा निघालेला नाही.”

“अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे प्रेशर पॉईंट तपासण्याचे काम सुरू केले आहे, लवकरच उपाययोजना केल्या जातील,” असे यासंदर्भात ठाकरे सेनेचे उपविभाग प्रमुख निलेश साळुंखे यांनी सांगितले.

प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिक त्रस्त

झोपडपट्ट्यांपासून ते उच्चभ्रू सोसायट्यांपर्यंत पसरलेली ही पाणीटंचाई मुंबई महापालिकेच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटी उघड करते. दोन्ही भागांतील नागरिकांनी तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता पालिका प्रशासन यावर काय कायमस्वरूपी तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!