पवई येथील एका नामांकित मॉलमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी स्पाचा मालक-चालकाला अटक केली असून, एका २४ वर्षीय पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे. ‘मॅग्निफिसेंट स्पा आणि सलून’ असे कारवाई झालेल्या स्पा सेंटरचे नाव आहे.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून हिरानंदानी कॉम्प्लेक्स भागात असणाऱ्या गॅलेरिया शॉपिंग मॉल येथील ‘मॅग्निफिसेंट स्पा आणि सलून’मध्ये मसाजच्या नावाखाली तरुणींना ठेवून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांनी साकीनाका विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना (ACP) अवगत केले. त्यानुसार, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ (PITA Act) अन्वये विशेष अधिकार वापरून तात्काळ एक तपास पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस निरीक्षक बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे, पो.ह. दीपक बोरसे, लांडगे, खंडागळे आणि महिला पोलीस शिपाई लाड यांचा समावेश होता.
“कारवाई पारदर्शक व्हावी यासाठी दोन पंचांसमक्ष एका खाजगी व्यक्तीला ‘बोगस ग्राहक’ (Decoy Customer) म्हणून तयार केले. या बोगस ग्राहकाला ५०० रुपयांच्या ११ नोटा (एकूण ५,५०० रुपये) देण्यात आल्या, ज्यांचे क्रमांक आधीच पंचांसमक्ष कागदावर नोंदवून घेण्यात आले होते,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “ठरल्याप्रमाणे, बोगस ग्राहक आणि एक पंच सायंकाळी स्पा सेंटरमध्ये गेले. तिथे स्पाचा मालक/चालक संतोष शेट्टी (वय ४६) याने बोगस ग्राहकाला मसाजसोबत शरीरसुखाचे आमिष दाखवून ३,५०० रुपयांची मागणी केली. बोगस ग्राहकाने दाखवलेल्या दोन तरुणींपैकी एका २४ वर्षीय तरुणीची निवड करून शेट्टीकडे पैसे सुपूर्द केले. तरुणी ग्राहकाला घेऊन स्पाच्या आतील छुप्या केबिनमध्ये जाताच बोगस ग्राहकाने पोलीस पथकाला ठरल्याप्रमाणे इशारा केला. संकेत मिळताच दबा धरून बसलेल्या पवई पोलिसांच्या पथकाने स्पावर तातडीने छापा टाकला.”
“केबिनमध्ये आम्हाला एक तरुणी रेक्जीनच्या बेडवर बसलेली आढळून आली. केबिनच्या झडतीदरम्यान आम्हाला आक्षेपार्ह साहित्य मिळून आले. यावरून येथे गैरप्रकार होत असल्याची खात्री झाली,” असे पवई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अजून एक अधिकाऱ्याने सांगितले की, “मुख्य काउंटरची झडती घेतली असता, तिथे पथकाला बोगस ग्राहकाकडून मिळालेल्या ५०० रुपयांच्या ११ नोटा (क्रमांक तंतोतंत जुळणाऱ्या) आणि इतर साहित्य हस्तगत मिळून आले.”
पोलिसांनी आरोपी संतोष शेट्टी याला ताब्यात घेतले असून, सुटका करण्यात आलेल्या पीडित तरुणीला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
या हायप्रोफाईल छाप्यामुळे पवई परिसरातील बेकायदेशीर स्पा चालकांचे धाबे दणाणले आहेत. पवई पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.



No comments yet.